वर्गात दांडी मारणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांची माहिती मिळणार पालकांना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2018 05:42 PM2018-09-13T17:42:07+5:302018-09-13T17:43:23+5:30
वैद्यकीय विद्यार्थ्यांची वर्गातील गैरहजेरी आता थेट पालकांपर्यंत पोहोचत आहे.
औरंगाबाद : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) वैद्यकीय विद्यार्थ्यांची वर्गातील गैरहजेरी आता थेट पालकांपर्यंत पोहोचत आहे. शरीररचनाशास्त्र विभागातील संगणकीय प्रणालीद्वारे पहिल्याच दिवशी वर्गात दांडी मारणाऱ्या ६४ विद्यार्थ्यांची माहिती पालकांपर्यंत पोहोचली.
‘एमबीबीएस’ला प्रवेश घेतल्यानंतर पहिल्या वर्षी विद्यार्थ्यांची नियमित वर्गांना उपस्थिती असते; परंतु दुसरे वर्ष लागताच विद्यार्थ्यांची वर्गातील गैरहजेरी वाढते. १५ ते २० टक्के विद्यार्थी गैरहजर राहत असल्याचे प्राध्यापकांचे म्हणणे आहे. विद्यार्थ्यांची लेखीसाठी ७५ टक्के आणि प्रात्यक्षिकांसाठी ८० टक्के उपस्थिती असणे आवश्यक असते. उपस्थितीसंदर्भात निकष पूर्ण न करणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्यास अपात्र केले जाते. गतवर्षी शरीररचनाशास्त्र विभागातील ९ विद्यार्थ्यांना गैरहजेरीमुळे अपात्र क रण्यात आले होते.
गैरहजेरीसंदर्भात महाविद्यालयाकडून पालकांना पत्र लिहिली जातात; परंतु त्याकडे दुर्लक्ष होते. या सगळ्यावर उपाय म्हणून यावर्षी गैरहजर राहणाऱ्या विद्यार्थ्यांची माहिती दररोज संगणकीय संदेशाद्वारे देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यास अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी मंजुरी दिली. उपअधिष्ठाता तथा शरीररचनाशास्त्र विभागप्रमुख डॉ. शिवाजी सुक्रे, सहायक प्राध्यापक डॉ. दीपक कावळे यांनी प्रयत्न करून ही प्रणाली कार्यान्वित केली. यामुळे विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढेल,अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
पहिले महाविद्यालय
विद्यार्थ्यांच्या गैरहजेरीची माहिती पालकांपर्यंत संदेशाद्वारे देणारे पहिले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ठरले आहे. शरीररचनाशास्त्र विभागापासून सुरुवात झाली आहे. इतर विभागातही ही प्रणाली कार्यान्वित करता येईल.
-डॉ. शिवाजी सुक्रे, उपअधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी)