उद्याने झाली बकाल !
By Admin | Published: February 27, 2017 12:23 AM2017-02-27T00:23:44+5:302017-02-27T00:25:00+5:30
उस्मानाबाद : शहरातील प्रमुख असलेल्या जिजामाता उद्यानासह विविध भागात पालिकेने उभारलेल्या उद्यानांची बकाल अवस्था झाली आहे़
उस्मानाबाद : शहरातील प्रमुख असलेल्या जिजामाता उद्यानासह विविध भागात पालिकेने उभारलेल्या उद्यानांची बकाल अवस्था झाली आहे़ त्यामुळे सकाळी-सायंकाळी फिरण्यासाठी बाहेर जाणाऱ्या वयोवृध्दांसह बालकांची मोठी गैरसोय होताना दिसत आहे़
उद्याने ही बालकांसह वयोवृध्दांसाठी महत्त्वाची बाब! विशेषत: शहरी भागातील सिमेंटच्या जंगलामध्ये उद्यानाची नितांत आवश्यकता़ शहरी भागात मोकळी हवा मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणून उद्यानांकडे पाहिले जाते़ ही गरज ओळखून नगर पालिकेकडून शहरातील जिजामाता उद्यानाची निर्मिती केली़ त्यापाठोपाठ मागील काही वर्षात शहरातील तांबरी विभाग, गणेश नगर, समता कॉलनी आदी विविध भागातही उपलब्ध जागेनुसार उद्याने, बगिचे तयार करण्यात आले आहेत़ या उद्यानांची उभारणी करण्यासाठी कोट्यवधी रूपयांचा निधी खर्च केला आहे़
प्रारंभीचा काळ वगळता नंतर मात्र, देखभाल दुरूस्तीकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने या उद्यानांची बकाल अवस्था झाली आहे़ शहरातील प्रमुख उद्यान असलेल्या जिजामाता उद्यानात मुलांना खेळण्यासाठी बसविण्यात आलेली अनेक खेळणी खराब झाली आहेत़ येथील वॉकवे, कारंजे, पाळण्यांची मोठी दुरवस्था झाली आहे़ नव्हे अनेक खेळण्यांचे लोखंडही चोरीस गेले आहे़ सद्यस्थितीत काही खेळण्यांचे सांगाडे इथे उभा असून, मिळणाऱ्या मोकळ्या जागेतच लहान मुले आपला वेळ घालवीत आहेत़ विशेषत: या उद्यानाच्या आवारातच शौचास बसणाऱ्यांची संख्या वाढल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे़
तांबरी विभागातील मुख्याधिकारी यांच्या निवासस्थाना शेजारीही एक उद्यान तयार करण्यात आले होते़ मात्र, या उद्यानाचेही तीन-तेरा झाले आहेत़ मुख्याधिकाऱ्यांच्या घराशेजारी असलेल्या उद्यानाची ही दुर्दैवी अवस्था पाहता पालिकेकडून उद्यानांच्या देखभाल-दुरूस्तीकडेच दुर्लक्ष होताना दिसत आहे़ गणेश नगर भागातील बगिचाचीही वेगळी अवस्था नाही़ येथील साहित्याची नासधूस झाली असून, लहान असलेला वॉकवे, संरक्षक भिंतींचीही पडझड झाली आहे़ दरम्यान, याबाबत पालिकेच्या नगराध्यक्षांसह अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही़