औरंगाबादमध्ये २० हजार चारचाकी वाहनांसाठी रस्तेच बनले पार्किंग स्लॉट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2019 05:48 PM2019-12-11T17:48:01+5:302019-12-11T17:54:33+5:30

गुंठेवारी भागांसह अनेक वसाहतींमध्ये  इमारतींत पार्किंगची जागाच नाही

Parking problem in Aurangabad; There are 20 thousand four-wheelers parked on the roads | औरंगाबादमध्ये २० हजार चारचाकी वाहनांसाठी रस्तेच बनले पार्किंग स्लॉट

औरंगाबादमध्ये २० हजार चारचाकी वाहनांसाठी रस्तेच बनले पार्किंग स्लॉट

googlenewsNext
ठळक मुद्दे४० एकर जागेवर वाहने उभी रस्तेच बनले पार्किंग स्लॉट

- संतोष हिरेमठ
औरंगाबाद : शहरात गेल्या काही वर्षांत चारचाकी वाहनांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मात्र, गंठेवारीसह अनेक वसाहतींमध्ये निवासी इमारतींमध्ये वाहनांच्या पार्किंगची व्यवस्थाच नाही. परिणामी, जवळपास २० हजार चारचाकी वाहनांची शहरातील रस्त्यांवरच पार्किंग होत आहे. तेही तब्बल ४० एकर जागेचा अनधिकृत ताबा घेऊन. त्यामुळे रस्त्यावरील रहदारीसह पार्किंगचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. 

शहरातील लोकसंख्या जेवढ्या झपाट्याने वाढत आहे तेवढ्याच गतीने वाहनांची संख्या वाढत आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील वाहनांची संख्या १४ लाखांवर गेली आहे. यामध्ये चारचाकी वाहनांची दररोज नव्याने भर पडत आहे. आरटीओ कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार ३१ नोव्हेंबरपर्यंत चारचाकी वाहनांची संख्या ८८ हजार ७६ वर गेली आहे. वाहन खरेदी प्रक्रिया सुलभ आणि सर्वसामान्यांना परवडेल अशी झाली आहे. त्यामुळे चारचाकी खरेदीचे प्रमाण वाढत आहे; परंतु वाहन खरेदी केल्यानंतर पार्किंगची कोणतीच व्यवस्था नसल्याची परिस्थिती शहरातील अनेक भागांत दिसते. वाहनांमुळे शहरातील वाहतूक कोंडी आणि प्रदूषणाची समस्या हाताबाहेर गेली असून, आता वाहन पार्किंगची समस्याही गंभीर रूप धारण करीत आहे. वाहनांना सार्वजनिक ठिकाणी आणि राहत्या घराच्या परिसरात अशा दोन प्रकारच्या पार्किंगची व्यवस्था लागते. मनपाच्या अनास्थेमुळे सार्वजनिक ठिकाणच्या पार्किंगचा बट्ट्याबोळ झालेला आहे.

शहरात अशी आहे परिस्थिती
शहरातील चारचाकी वाहनांची संख्या किमान ४० हजारांवर आहे. यातील ५० टक्के वाहनांसाठी निवासस्थानी पार्किंगची व्यवस्था असल्याचे गृहीत धरले तरी किमान २० हजार वाहने रस्त्यावरच उभी केली जात असल्याचे दिसते. त्यासाठी ४० एकर जागेचा अनधिकृतरीत्या पार्किंगसाठी वापर केला जातो. निवासी इमारतीमध्ये वाहने उभी करण्यासाठी जागाच नसल्याने ही सर्व वाहने रस्त्यांवर उभी केली जात आहेत. रस्त्यांवर वाहने उभे करण्यावरून अनेक ठिकाणी खटके उडतात. त्यातून वाहनांच्या टायरमधील हवा काढणे, वाहनांचे नुकसान करणे आदी प्रकारही होतात. त्यातून भांडणांचे पर्यवसान हाणामारीपर्यंतही जाते.

रुग्णवाहिका, अग्निशमन बंबाला अडथळा
अनेक भागांमध्ये सर्रास निवासस्थानाबाहेरील रस्त्यांवरच चारचाकी वाहने उभी केली जातात. जागेवरच एक प्रकारे हक्कच दाखविला जातो. अशा भागांमध्ये आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका, अग्निशमन बंब पोहोचणेही अशक्य होते. निवासस्थानक एकीकडे आणि चारचाकी रस्त्यावर अशी अवस्था पाहायला मिळते. घरासमोरील रस्त्यांवरच होणाºया पार्किंगमध्ये रात्रीच्या वेळी अनेक भागांतील गल्ल्यांमध्ये दुचाकीही जाऊ शकत नाही, अशी अवस्था आहे.

एका चारचाकीला लागते एवढी जागा
चारचाकी वाहनांचे अनेक प्रकार (मॉडेल) आहेत. यामध्ये सर्वात लहान आकार असलेल्या एका चारचाकी वाहनाला पार्किंगसाठी ४० चौरस फूट जागा लागते.४यानुसार एका एकरमध्ये म्हणजे ४३ हजार ५६० चौरस फूट जागेत १ हजार ८९ वाहने ही दाटीवाटीने उभी होतील. मात्र, पार्किंगच्या सुविधा आणि रचनेचा विचार करता एक एकर जागेत किमान ५०० वाहने उभी होतील. त्यानुसार जिल्ह्यातील ८८ हजार ७६ चारचाकी वाहने उभी करण्यासाठी तब्बल १७६ एकर जागा व्यापते. 

Web Title: Parking problem in Aurangabad; There are 20 thousand four-wheelers parked on the roads

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.