पक्षांना मतविभाजनाची चिंता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2017 12:10 AM2017-09-30T00:10:13+5:302017-09-30T00:10:13+5:30
प्रमुख पक्षांसह २५३ अपक्षांनीही प्रचारात जोर लावल्याने बहुतांश प्रभागांमध्ये काट्याच्या लढती होण्याची चिन्हे असून प्रमुख उमेदवारांना मतविभाजनाची चिंता सतावत आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : महानगरपालिकेच्या निवडणूक प्रचाराची रणधुमाळी रंगली आहे़ ८१ जागांसाठी होत असलेल्या या निवडणुकीसाठी तब्बल ५८१ उमेदवार रिंगणात आहेत़ विशेष म्हणजे, प्रमुख पक्षांसह २५३ अपक्षांनीही प्रचारात जोर लावल्याने बहुतांश प्रभागांमध्ये काट्याच्या लढती होण्याची चिन्हे असून प्रमुख उमेदवारांना मतविभाजनाची चिंता सतावत आहे़
मागील १९ वर्षांपासून नांदेड महानगरपालिकेवर काँग्रेसची सत्ता आहे़ या निवडणुकीत विजय मिळवून सत्ता कायम राखण्याचे काँग्रेसपुढे आव्हान आहे़ तर केंद्रात व राज्यात असलेल्या सत्तेचा लाभ उठवित नांदेडचा गड काबीज करण्याचे मनसुबे भाजपाने आखले आहेत़
राष्ट्रवादी आणि शिवसेनेसाठीही ही निवडणूक तशी अस्तित्वाचीच आहे़ या दोन्ही पक्षांचा भर मागील निवडणुकीत असलेले बलाबल टिकविण्याकडे असणार आहे़ चारही पक्ष निवडणुकीला स्वतंत्रपणे सामोरे जात आहेत़
त्यातच २५३ अपक्ष उमेदवार रिंगणात असल्याने बहुतांश ठिकाणी तिरंगी तर अनेक ठिकाणी चौरंगी लढती होत असल्याचे चित्र आहे़ काँग्रेस सर्व ८१ जागांवर निवडणूक लढवित असून काँग्रेसपाठोपाठ भाजपाचे ८० उमेदवार आहेत़ भाजपाने सर्व ८१ जागांवर उमेदवार दिले होते़, परंतु अर्जाच्या छाननीमध्ये प्रभाग क्रमांक १२ ‘ड’ मधील उमेदवाराचा अर्ज अवैध ठरविला गेल्याने आता ८० जागांवरच भाजपाला आपले बळ आजमावावे लागणार आहे़ भाजपापाठोपाठ शिवसेना ७१ जागांवर उमेदवार देण्यात यशस्वी ठरली आहे़
विशेष म्हणजे, मागील पाच वर्षांत शिवसेनेत मोठ्या प्रमाणात पडझड झालेली आहे़ गत निवडणुकीत शिवसेनेने ४५ जागांवर उमेदवार दिले होते़ सेनेपाठोपाठ राष्ट्रवादी ५५ जागांवर नशीब आजमावत आहे़
अनेक प्रभागांत राष्ट्रवादीला यंदा उमेदवार मिळाले नाहीत़ एआयएमआयएमने मागील वर्षी ११ जागांवर विजय खेचत राज्याच्या राजकारणात दमदार एन्ट्री केली होती़ एआयएमआयएमच्या या कामगिरीची राज्यभरात चर्चाही झाली़ मात्र मध्यंतरीच्या काळात एमआयएमच्या काही नगरसेवकांनी काँग्रेसच्या वळचणीला जाणे पसंत केल्याने या पक्षाने यावेळी बसपासोबत आघाडी करीत केवळ ३२ जागांवर उमेदवार दिले आहेत़ बसपा १७ जागांवर निवडणूक लढवित आहे़
एकूणच प्रमुख पक्षांचा एकला चलो रे चा नारा आणि त्यातच अपक्षांची पडलेली भर यामुळे बहुतांश प्रभागांत चुरस अनुभवण्यास मिळत आहे़ कोण किती मते खेचतो याबरोबरच कोण कोणाची मते वजा करतो, यावरही विजयाचे गणित अवलंबून आहे़