ढवारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 06:19 PM2018-03-10T18:19:21+5:302018-03-10T18:20:25+5:30

लघुकथा : खूप दिवसांनंतर गावाकडं गेलो होतो. शेताकडं फेरफटका मारून सगळ्यांच्या गाठीभेठी घेता-घेता बराच उशीर झाला होता. दिवस मावळताची गाडी चुकली तर पुढं चार किलोमीटर पायी रपेट मारण्याशिवाय पर्याय नव्हता, म्हणून थोडासा वेग वाढवून झपाझप चालत होतो. तितक्यात दुसर्‍या पाऊलवाटनं मुकिंदा आडवा आला. ‘मास्तर लई दिसाला आलास सबागती आज आपल्या शेती  ‘ढवारा’ हाय. -हाय गड्या’ म्हणून आग्रह करू लागला.  

party | ढवारा

ढवारा

googlenewsNext

- प्रदीप धोंडिबा पाटील

मी म्हणालो, ‘आरं पण मुकिंदा खळं करण्याची सगळी रीत बदलली. तरीही ढवारा अजून पूर्वीसारखा चालू आहे का रं?’  ‘तुम्ही गाव सोडला अन् रीत बी सोडली; पण आमी गावात -हातू ना. आम्हाला कसं सोडता ईल? पैलं सारकं ढवार्‍याचं वयभैव न्हाई -हायलं. ही गोस्ट खरी हाय. पणीक ज्याच्या त्याच्या आयपती परमाणं ल्हाणं- मोठा ढवारा अजून चालूच हाय. कैकानी बंद बी करून टाकलाय. पैलं सरकं आम्लीच्या आवतनाला लोक धाऊन बी येत न्हाईत. लोक बी लई माजोरी झालं. पर आमचा म्हतारबा. बंद करायचं नाव काढू देत न्हाई. लक्षुमी मायच्या आम्लीच्या निमतानं चार माणसाचे हात धुवाया भेटतात. तेवढंच पुण्य गाठीशी र्हाईल मन्तो. ‘मुकिंदानं नेमक्या शब्दांत चालू ढवार्‍याचा सगळा इतिवृतांत सांगून टाकला.

मुकिंदाच्या बोलण्यातल्या ‘अंबलीच्या’ उल्लेखाने कुटलेल्या जिर्‍याची व लसणाची पुड टाकून बनवलेल्या भूतकाळातल्या अंबलीचा सुंगध आरपार माज्या नाकातून मस्तकापर्यंत गेला. अन् पुढची पावलं अडखळले. मी माघारी वळलो. गावाकडं असताना ‘ढवारा’ आणि ‘सांजं’ हे आमचे आवडीचे विषय. रब्बीच्या हंगामात टाळकी ज्वारीचं खळं पडलं की, शेतोशेत ‘ढवारा’  आणि ‘सांजं’ यांची अगदी लयलूट व्हायची. शेता शेजारचे शेतकरी आलटून-पालटून टाळक्याच्या खळ्यावर ढवार्‍याचं जेवण ठेवायचे. बारा-बलुतेदारासहित जास्तीत जास्त लोकांना आवतन द्यायची एकमेकात मोठी चढाओढ लागायची.  कोणाच्या ढवार्‍यात कोण किती डोपे  (द्रोण) अंबिल पितो याची पैज लागायची. अंबलीच्या चवीचीही पुढच्या वर्षीच्या ढवार्‍यापर्यंत चर्चा होत राहायची. हे सगळं आठवता-आठवता मुकिंदाचं शेत कधी आलं कळलं नाही.

अंथरलेल्या मेनकापडावर धान्याची रास टाकण्यात आली होती. राशीच्या डोक्यावर पोतं अंथरण्यात आलं होतं. राशी भोवताल आंब्याचे ढाळे खोवण्यात आले होते. कडब्याच्या पेंडीची छोटीशी खोप उभी करून   त्यात उभा राघोल ठेवण्यात आला होता. त्यावर नवं सुडकं पांघरण्यात आलं होतं. मातीच्या पाच  ढेकळाची लक्ष्मी मांडण्यात आली होती. त्याच्या पुढं खापराच्या दिवलाण्यात कापसाच्या वातीचा दिवा मिनमिनत होता. त्या अंधुकशा उजेडात चार-दोन माणसं अंगावर चादर गुंडाळून लांब पडली होती. थोडं बाजूला एक माणूस जाळ लावून शेकत होता. बहुतेक तो हालरवाला असावा. मुकिंदा व त्याचा ‘बा’ पुढं होऊन लक्ष्मीची पूजा केली. जागलीवर असलेल्या माणसांचं जेवण झालं, अंबिल पिऊन झालं. मी ही मोठ्या कष्टाने दोन डोपे अंबिल प्यायचा प्रयत्न केला; मात्र त्या अंबिलीचा पूर्वीचा सुगंध व ती चव मात्र काही केल्या येत नव्हती. मोजकी लोकंच जेवायला असल्यामुळे ढवार्‍याची रंगतही आली नाही. 

गावाकडून आलेली माणसं ही भूत पाठीमागे लागल्यासारखी गपागपा जेवून मोजकं तेवढंच बोलून आल्या पावली गावाकडं निघून गेली. पूर्वी ढवार्‍याचं जेवल्यावर घरला जाता यायचं नाही.  कुणी गेलच तर जाणार्‍याच्या पावली लक्ष्मी निघून जाते, असं मानलं जायचं. मी मात्र पूर्वीचे संकेत पाळत रात्री मुक्कामाला खळ्यावर राहिलो.  मुकिंदा व त्याचा बा पडकन झोपी गेले; मात्र मला रात्रभर झोप काही लागली नाही. पूर्वीचं ढवार्‍याच्या जेवणानंतरचं ‘जागरण’ आठवण्याचा प्रयत्न करीत होतो. सगळ्या गावाची चर्चा ढवार्‍याच्या जागलीवर रंगायची. वारीक, वर्टी, सुतार, लोहार, भोई, ही मंडळी गावगाड्यातले अनेक किस्से रंगवू-रंगवू सांगायचे. त्यात कधी उजडून जायचं पत्ता लागायचा नाही. आज मात्र झोपही लागत नव्हती अन् उजाडतही नव्हतं.
( patilpradeep495@gmail.com )

Web Title: party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.