पक्षफोडीचे राजकारण संपले असेल, दुष्काळजन्य परिस्थितीबाबत श्वेतपत्रिका जाहीर करावी: कपिल पाटील
By विजय सरवदे | Published: August 14, 2023 03:22 PM2023-08-14T15:22:16+5:302023-08-14T15:24:38+5:30
राज्यात अत्यंत कमी पाऊस झाला आहे. धरणे भरलेली नाहीत. पिण्याच्या पाण्याचे संकट ओढावणार आहे.
छत्रपती संभाजीनगर : पावसाने पाठ फिरवल्यामुळे राज्यावर पाण्याचे संकट ओढवणार आहे. त्यामुळे राज्य सरकारने पक्षफोडीचे राजकारण संपले असेल, तर आता अवर्षणप्रवण भागांचा दौरा करून श्वेतपत्रिका जाहीर करावी, अशी मागणी जनता दलाचे (युनायटेड) महासचिव आ. कपिल पाटील यांनी आज येथे केली.
एका खासगी कार्यक्रमासाठी आ. कपिल पाटील शहरात आले होते. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, राज्यात अत्यंत कमी पाऊस झाला आहे. धरणे भरलेली नाहीत. पिण्याच्या पाण्याचे संकट ओढावणार आहे. शेती आणि उद्योगांची परिस्थिती गंभीर बनणार आहे. त्यामुळे आता सत्तासंघर्षाचा खेळ संपलेला असेल, तर भयावह स्थिती निर्माण होण्यापूर्वीच सरकारने अवर्षणप्रवण भागांचा दौरा करावा व श्वेतपत्रिका जाहीर करावी. श्वेतपत्रिकेमुळे दुष्काळजन्य परिस्थितीवर उपाययोजना करता येतात.
देश आणि लोकशाही वाचविण्यासाठी काँग्रेससह देशातील विविध पक्षांची ‘इंडिया’ या नावाने आघाडी तयार झाली आहे. यामध्ये अनेक दिग्गज पक्ष सहभागी झाले आहेत. या दृष्टीकोनातून राज्यात जनता दलाचा विचार मानणारे अनेक घटक विखुरलेले आहेत. त्यांच्या एकत्रिकरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे. मुंबईत या संदर्भात एक बैठक झाली आहे. यासाठी कोकण भागाची जबाबदारी जेडीयूचे प्रदेश कार्याध्यक्ष अतुल देशमुख, तर मराठवाड्याची अजित शिंदे यांच्याकडे आहे. राज्यात प्रकाश आंबेडकरांचा मोठा प्रभाव आहे. त्यांना सोडून चालणार नाही. त्यांना विश्वासात घ्यावेच लागेल. याबाबत श्रेष्ठी विचार करत आहेत.
... नाही तर रोटरीसारखा क्लब चालवावा
रोजगार, महागाई हे महत्त्वाचे प्रश्न बाजूला ठेवून सरकारमधील मंडळी महाआरोग्य शिबिरे आयोजित करत आहेत. अशी शिबिरे तर लायन्स, रोटरी क्लब आयोजित करतात. एक तर या मंडळींनी सरकार चालवावे, नाही तर रोटरीसारखा क्लब चालवावा. आरोग्य, शिक्षण, रोजगार देणे हे तर शासनाचे काम असते. त्यासाठी मेळावे घेण्याची काय गरज, असा प्रश्न आ. पाटील यांनी उपस्थित केला.