बजाजनगरात पर्युषण महापर्वाला उत्साहात सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:04 AM2021-09-05T04:04:32+5:302021-09-05T04:04:32+5:30
वाळूज महानगर : बजाजनगरातील जैन स्थानकात शनिवारी पर्युषण महापर्वास उत्साहात सुरुवात करण्यात आली. या पर्युषण महापर्वात आठवडाभर प्रवचनासह विविध ...
वाळूज महानगर : बजाजनगरातील जैन स्थानकात शनिवारी पर्युषण महापर्वास उत्साहात सुरुवात करण्यात आली. या पर्युषण महापर्वात आठवडाभर प्रवचनासह विविध धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहेत.
श्री वर्धमान श्वेतांबर स्थानकवासी जैन श्रावक संघ पंढरपूर- बजाजनगरच्या वतीने तेथील जैन स्थानकात शनिवारी डॉ. अशोककुमार पगारिया यांच्या प्रवचनाने पर्युषण महापर्वाला सुरुवात करण्यात आली. यावेळी प्रवचनातून समाज प्रबोधन करताना डॉ. पगारिया म्हणाले की, पर्युषण महापर्व हे जैन समाजाचे सर्वात मोठे आध्यात्मिक पर्व असून, या महापर्वात तप, जप, साधना, दान आणि स्वाध्याय यांच्या माध्यमातून पंच परमेष्ठीची आराधना केली जाते. पर्युषण म्हणजे सर्वंकष उपासना, साधना आणि स्वाध्याय आपल्या जीवनाला नवीन ऊर्जा देण्याचे काम करतात. स्वार्थातून परमार्थाकडे, संसाराकडून विरक्तीकडे, परिग्रहातून अपरिग्रहाकडे, आत्म्याकडून परमात्याकडे जाण्याचा मार्ग या महापर्वामधील जप, तप, साधना यांच्या माध्यमातून जाऊन आत्मकल्याणाचा मार्ग प्रशस्त होतो, असेही डॉ. पगारिया यांनी आपल्या प्रवचनातून पटवून दिले.
कार्यक्रमात स्वाध्यायी ॲड. पी. एम. जैन यांनी अंतगड सूत्र वाचन करून त्याचे महत्त्व विशद केले. स्वाध्यायी शांतीलाल फुलपगर यांनी प्रतिक्रमण करविले. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून विविध कार्यक्रम घेण्यात आले. कार्यक्रमाला श्री वर्धमान श्वेतांबर स्थानकवासी जैन श्रावक संघ पंढरपूर-बजाजनगरचे अध्यक्ष संतोष चोरडिया, उपाध्यक्ष किशोर राका, महामंत्री चंद्रकांत चोरडिया, सहमंत्री डॉ. प्रवीण तातेड, पारसचंद साकला आदींसह जैन समाजबांधव व महिलांची उपस्थिती होती.
फोटो ओळ- बजाजनगरातील जैन स्थानकात आयोजित पर्युषण महापर्वात प्रवचनातून समाज प्रबोधन करताना डॉ. अशोक पगारिया तर शेजारी ॲड. पी. एम. जैन, शांतीलाल फुलपगर आदी दिसत आहेत.
फोटो क्रमांक- प्रवचन
--------------------------