पर्युषण पर्वाला आजपासून प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 12:59 AM2017-08-18T00:59:59+5:302017-08-18T00:59:59+5:30
जैन धर्मातील पवित्र पर्युषण पर्वाला उद्या १८ आॅगस्टपासून प्रारंभ होत आहे. पुढील नऊ दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन शहरात करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : जैन धर्मातील पवित्र पर्युषण पर्वाला उद्या १८ आॅगस्टपासून प्रारंभ होत आहे. पुढील नऊ दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन शहरात करण्यात आले आहे.
श्वेतांबर वर्धमान जैन सेवा संघ
सिडको एन-३ येथील श्वेतांबर वर्धमान जैन सेवा संघाच्या वतीने १८ ते २७ दरम्यान पर्युषण महापूर्व आराधना करण्यात येणार आहे. येथील शंखेश्वर पार्श्वनाथ जैन जिनालयामध्ये दररोज सकाळी ६ वाजता शहनाई वादन, त्यानंतर भगवंतांचा अभिषेक, आरती. केशरबाग सभागृहात साध्वीजी शासनदीपिका सुयशाश्रीजी म. सा. आदिठाणा ४ यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी ८.३० वाजता सूत्रवाचन, ९.१५ ते १०.१५ प्रवचन. दुपारी कल्पसूत्र, धार्मिक स्पर्धा, सायंकाळी प्रतिक्रमण भक्तिगीतांचा कार्यक्रम होणार आहे. २७ रोजी सामूहिक क्षमापना कार्यक्रमाने पर्युषण पर्वाची सांगता होईल, अशी माहिती श्वेतांबर वर्धमान जैन सेवा संघाच्या वतीने देण्यात आली आहे.
विमलनाथ नवग्रह जैन मंदिर
जाधवमंडी येथील विमलनाथ नवग्रह जैन मंदिर येथे १८ पासून पर्युषण पर्वाला सुरुवात होत आहे. आचार्य देवचंद्रसागर सुरीश्वर म. सा., पंन्यास प्रवर दिव्यचंद्रसागरजी म. सा., मुनीश्री मन्मितसागरजी म. सा. व साध्वीश्री पुष्पदंताश्रीजी म. सा. आदिठाणा ५ यांच्या मार्गदर्शनानुसार महापर्व साजरे करण्यात येणार आहे. दररोज सकाळी ६ वाजता मंगल दर्शन, अभिषेक, ९ वाजता प्रवचन, सायंकाळी प्रतिक्रमण आदी धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. २५ रोजी पर्युषण महोत्सवाची सांगता होणार आहे.
आनंदजी- कल्याणजी जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्टच्या वतीने जोहरीवाडा येथील गोडीजी पार्श्वनाथ श्वेतांबर जैन मंदिर येथे पर्युषण पर्व साजरे करण्यात येणार आहे. दिव्यचंद्रसागरजी म. सा. व मुनीश्री मन्मितसागरजी म. सा. यांच्या मार्गदर्शनाखाली अष्टानिका प्रवचन व जन्मवाचन व प्रज्ञाश्रीजी म.सा. व अर्केन्दूश्रीजी म. सा. आदिठाणा २ यांच्या मार्गदर्शनाखाली पर्युषण पर्व होणार आहे. १८ रोजी भगवंतांच्या अभिषेकाने धार्मिक कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे.