घाटी रुग्णालयात आता दाखल रुग्णांना भेटण्यासाठी पास बंधनकारकच
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2024 07:41 PM2024-03-23T19:41:36+5:302024-03-23T19:42:01+5:30
चोवीस तासांसाठी लाल, तर भेटायला येणाऱ्यांसाठी निळ्या रंगाचा पास
छत्रपती संभाजीनगर : घाटी रुग्णालयात रुग्णांसोबत थांबणारे नातेवाइक, भेटायला जाणाऱ्यांसाठी आता पास योजनेची अंमलबजावणी होणार आहे. यात रुग्णांना २४ तास भेटण्यासाठी दोन वेगवेगळ्या प्रकारचे पासचे वाटप करण्यात येणार असून, आजपासूनच ही पास प्रणाली सुरू होणार असल्याचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी सांगितले.
काही महिन्यांपूर्वी घाटी रुग्णालयातच उपचार घ्यायला गेलेल्या तरुणाला मारण्यासाठी पन्नासपेक्षा अधिक टवाळखोरांच्या गटाने प्रवेश केला होता. वारंवार रुग्णाचे नातेवाईक व डॉक्टरांमध्ये वादाचे प्रसंग घडतात. शिवाय, रुग्णाला भेटायला एकाच वेळी १० ते १५ नातेवाईक आल्याने उपचारांमध्येदेखील अडथळा निर्माण होतात. या सर्व बाबी लक्षात घेता शुक्रवारी घाटीत दुपारी सुक्रे यांनी सुरक्षा समितीची बैठक घेत पास प्रणालीवर चर्चा केली. निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. शोएब यांच्याकडे पास वितरण व संकलन जबाबदारी देण्यात आली.
अशी असेल प्रणाली
- रुग्णाला २४ तास भेटण्यासाठी दोन प्रकारचे पास देण्यात येतील.
- त्यामध्ये रुग्णासोबत थांबणाऱ्या नातेवाइकांना लाल रंगाचे दोन पासेस देण्यात येतील. तर भेटायला येणाऱ्या नातेवाइकासाठी एक निळ्या रंगाचा पास मिळेल.
- रुग्ण गंभीर असेल तर अतिरिक्त लाल रंगाचे दोन पास देण्यात येतील. पास नसेल तर कोणालाही आता घाटी रुग्णालयात प्रवेश मिळणार नाही.
- रात्री ११ वाजेपर्यंत नातेवाइकांना प्रवेश मिळेल. भविष्यात ही वेळ नऊ वाजेपर्यंत आणली जाईल.
- अपघात, एखाद्या मोठ्या घटनेत रुग्णासोबत दोनपेक्षा अधिक नातेवाईक, मित्र येतात. अशा अपवादात्मक परिस्थितीत निश्चित काही वेळेसाठी नातेवाइकांना आत सोडण्यात येईल.
त्रास होईल, पण रुग्णाच्या फायद्यासाठीच
पास प्रणाली अनेकांना अडचणीचे वाटेल. मात्र, रुग्णाच्या प्रकृतीच्या दृष्टिकोनातूनच हा निर्णय घेण्यात आला आहे. रुग्णालयातील आतील भाग स्वच्छ राहावा, रुग्णाला संसर्ग होऊ नये, हा उद्देश आहे. रुग्ण, नातेवाइकांनी सहकार्य करावे.
- डॉ. शिवाजी सुक्रे, अधिष्ठाता.