टीईटी परीक्षा दिली दीड वर्षापूर्वी, उत्तीर्ण प्रमाणपत्र मिळाताहेत आता
By विजय सरवदे | Published: April 8, 2023 07:24 PM2023-04-08T19:24:51+5:302023-04-08T19:25:04+5:30
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १९ हजारांपैकी फक्त ७६२ उमेदवार उत्तीर्ण
छत्रपती संभाजीनगर : दीड वर्षापूर्वी दिलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेत (टीईटी) उत्तीर्ण झालेल्या डीएड, बीएड धारक उमेदवारांना गुरुवापासून प्रमाणपत्र वितरित करण्याची प्रक्रिया सुरू झाली. जिल्ह्यात १९ हजारांपैकी उत्तीर्ण झालेल्या अवघ्या ७६२ उमेदवारांची प्रमाणपत्रे वितरणासाठी शिक्षण विभागाकडे प्राप्त झाली आहेत.
शिक्षक पदासाठी ‘टीईटी’ बंधनकारक असल्याने राज्यातील लाखो डीएड, बीएड धारक उमेदवार या परीक्षेला प्रविष्ट होतात. कोरोनामुळे राज्य परीक्षा परिषदेला २०१९ पासून शिक्षक पात्रता परीक्षेचे (टीईटी) नियोजन करता आले नव्हते. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर २१ नोव्हेंबर २०२१ रोजी ही परीक्षा घेण्यात आली. मात्र, या परीक्षेचा निकाल जाहीर होण्यापूर्वी २०१८ मध्ये झालेल्या ‘टीईटी’ परीक्षेतील घोटाळा उघडकीस आला. त्यामुळे या परीक्षेचा निकाल लांबणीवर पडला होता.
२१ नोव्हेंबर २०२१ रोजी झालेल्या शिक्षक पात्रता परीक्षेचा (टीईटी) निकाल परीक्षा परिषदेने २१ ऑक्टोबर २०२२ रोजी जाहीर केला. इयत्ता पहिली ते पाचवी गटासाठी (पेपर एक) ११ हजार ४६६ उमेदवारांनी, तर इयत्ता सहावी ते आठवी गटासाठी (पेपर दोन) ८ हजार ४९० उमेदवारांनी ही परीक्षा दिली होती. पहिल्या गटात ४६०, तर दुसऱ्या गटात ३०२ उमेदवार उत्तीर्ण झाले. या निकालाची टक्केवारी अवघी ३.८ एवढी आहे.
प्राथमिक शिक्षण विभागात ६, १० व ११ एप्रिल रोजी सकाळी १० ते सायंकाळी वाजेपर्यंत टीईटी उत्तीर्णांना प्रमाणपत्रांचे वाटप होणार आहे. यासाठी संबंधित उमेदवारांना परीक्षा प्रवेशपत्र, ऑनलाइन गुणपत्रिका, जात वैधता प्रमाणपत्र, आधार कार्ड किंवा पॅन कार्ड सोबत घेऊन प्राथमिक शिक्षण विभागात संबंधितांना जावे लागणार आहे.