दिल्ली, मुंबईसाठी एअर इंडियाच्या विमानाला वाढली प्रवाशांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2019 08:31 PM2019-05-24T20:31:42+5:302019-05-24T20:34:10+5:30
१२२ वरून १६२, आता १८२ आसनी विमान
औरंगाबाद : जेट एअरवेजचे विमान बंद झाल्यापासून औरंगाबादहून मुंबई आणि दिल्लीला जाणाऱ्या प्रवाशांना एकमेव एअर इंडियाच्या विमानाचा पर्याय उरला आहे. परिणामी एअर इंडियाच्या विमानाला प्रवाशांची गर्दी वाढत आहे. जेट बंद झाल्यानंतर एअर इंडियाचे १२२ वरून १६२ आसनी विमान येत होते. प्रवाशांची संख्या वाढतच असल्याने आता मुंबई-औरंगाबाद-दिल्लीसाठी १८२ आसनी विमानाचे उड्डाण होत आहे.
जेट एअरवेजच्या सकाळच्या विमानामुळे औरंगाबादकरांना मुंबईमार्गे दिल्लीची हवाई सेवा उपलब्ध होती. या कंपनीच्या विमानसेवेने सकाळच्या वेळेत मुंबई आणि दिल्लीला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी होती. मात्र, २३ मार्चपासून ही विमानसेवा अचानक ठप्प झाली. जेट एअरवेजची विमानसेवा सुरू असताना पूर्वी एअर इंडियाचे १२२ प्रवासी क्षमतेचे विमान उड्डाण घेत होते; परंतु जेट बंद होताच एअर इंडियाची प्रत्येक दिवसाच्या जागा आरक्षित होणे सुरू झाले. दिवसेंदिवस प्रवाशांची मागणी वाढल्यामुळे एअर इंडियाच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी मोठे विमान देण्याची विनंती केली होती. अखेर ५ एप्रिल रोजी एअर इंडियाच्या १६२ आसनी विमानाने उड्डाण केले. आता मुंबई-औरंगाबाद-दिल्लीसाठी १८२ आसनी विमान उड्डाण घेत आहे.
जोरदार तिकीट विक्री, पुणे, रेल्वेचा आधार
दिल्ली, मुंबईसाठी एकमेव विमानाचा पर्याय राहिला आहे. त्यामुळे महत्त्वाच्या कामासाठी मुंबई, दिल्ली जाणाऱ्या प्रवाशांना विमानाचे बुकिंग फूल झाल्याचा अनुभव येत आहे. अशावेळी दिल्लीला विमानाने जाण्यासाठी पुणे गाठावे लागते, तर मुंबईसाठी रेल्वेचा आधार घ्यावा लागतो; परंतु रेल्वेचे आरक्षणही मिळत नसल्यामुळे वाहनाने मुंबईला जाण्याची वेळ शहरवासीयांवर येत आहे. औरंगाबादहून दिल्ली, मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. त्यामुळे या प्रमुख मार्गांवर विमानसेवा सुरू करण्याची संधी नव्या कंपन्यांना असल्याचे वाहतूक क्षेत्रातील तज्ज्ञ म्हणाले.
बुकिंग : १८२ आसनी विमानाचे उड्डाण
एअर इंडियाच्या विमानाचे बुकिंगदेखील वाढत आहे. यापूर्वी प्रवाशांच्या सुविधेसाठी १६२ आसनी विमान दाखल झाले होते. आता मुंबई-औरंगाबाद-दिल्ली मार्गावर १८२ आसनी विमान उड्डाण घेत असल्याची माहिती एअर इंडियाचे अजय भोळे यांनी दिली.