प्रवासी सेवा समितीने औरंगाबाद रेल्वेस्टेशनसाठी केलेल्या सूचना कागदावरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 06:58 PM2018-02-13T18:58:33+5:302018-02-13T18:59:57+5:30
मॉडेल रेल्वेस्टेशनवर पाच महिन्यांपूर्वी रेल्वे बोर्डाच्या प्रवासी सेवा समितीने पाहणी करून सोयी-सुविधांविषयी सूचना केल्या; परंतु अद्यापही यातील काही सूचना कागदावरच आहेत. स्टेशनवर उघड्या ड्रेनेज चेंबरमुळे प्रवासी पडण्याची भीती समितीने अहवालात नमूद केली होती; परंतु अद्यापही चेंबरची परिस्थिती ‘जैसे थे’ आहे.
औरंगाबाद : मॉडेल रेल्वेस्टेशनवर पाच महिन्यांपूर्वी रेल्वे बोर्डाच्या प्रवासी सेवा समितीने पाहणी करून सोयी-सुविधांविषयी सूचना केल्या; परंतु अद्यापही यातील काही सूचना कागदावरच आहेत. स्टेशनवर उघड्या ड्रेनेज चेंबरमुळे प्रवासी पडण्याची भीती समितीने अहवालात नमूद केली होती; परंतु अद्यापही चेंबरची परिस्थिती ‘जैसे थे’ आहे.
प्रवासी सेवा समितीने १२ सप्टेंबर रोजी औरंगाबाद रेल्वेस्टेशनवर पाहणी केली होती. समितीचे निर्मल सिन्हा, अंजू मखिजा, कैलाशनाथ शर्मा, राकेश शाह, पंकजकुमार पाठक, रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षांचे सचिव लालमणी लाल यांनी ही पाहणी केली होती. रेल्वेस्टेशनवरील अस्वच्छता आणि प्रवाशांच्या असुविधांविषयी या समितीने ‘दमरे’च्या अधिकार्यांना धारेवर धरत चांगलेच खडेबोल सुनावले होते.
जुन्या इमारतीसमोरील ड्रेनेज चेंबरची अवस्था पाहून सदस्य थक्क झाले होते. रेल्वेस्टेशनच्या आवारातही ठिकठिकाणी अस्वच्छता समितीने रेल्वे अधिकार्यांच्या निदर्शनास आणून दिली. या समितीने संपूर्ण पाहणीचा अहवाल रेल्वे बोर्डाला सादर केला; परंतु त्यानंतरही रेल्वेस्टेशनवरील ड्रेनेज चेंबरच्या अवस्थेत सुधारणा झालेली नाही. रेल्वे अधिकार्यांकडून समितीच्या सूचनांकडे दुर्लक्ष केले जात आहे.
अहवालात नमूद काही नोंदी
स्टेशनवर काही काही ठिकाणी ड्रेनेज चेंबर उघडे आहेत. त्यामुळे प्रवासी पडण्याची भीती आहे. परिसरात शौचालय नाही. त्यामुळे अस्वच्छता वाढली आहे. पाण्याच्या तोट्या कमी आहेत.स्लीपर क्लासचे शौचालय स्वच्छ आणि मोठे आहे.मुकुंदवाडी रेल्वेस्टेशनवर एक्स्प्रेस रेल्वे थांबण्याची मागणी आहे.