रेल्वेगाड्या उशिरा धावत असल्याने प्रवाशांनी केला काळ्या फिती बांधून प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 12:30 PM2019-01-28T12:30:56+5:302019-01-28T12:41:36+5:30
वारंवार उशीरा धावणाऱ्या रेल्वेगाड्यांमुळे त्रस्त झालेल्या प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाचा निषेध म्हणून आज काळ्या फिती बांधून रेल्वे प्रवास केला.
औरंगाबाद : वारंवार उशीरा धावणाऱ्या रेल्वेगाड्यांमुळे त्रस्त झालेल्या प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाचा निषेध म्हणून आज काळ्या फिती बांधून रेल्वे प्रवास केला.
दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातून नियमित प्रवास करणारे मासिक पास धारक प्रवाशांना उशीरा धावणाऱ्या रेल्वेंमुळे मनस्ताप होत आहे. कधी मेगा ब्लॉक, कधी इंजिनिअरिंग ब्लॉक तर कधी इंजीन नादुरुस्तीमुळे रेल्वेला उशीर होण्याचा प्रकार होत आहे. धर्माबाद-मनमाड हायकोर्ट एक्स्प्रेस, निजामाबाद-पुणे-निजामाबाद पॅसेंजर, काचिगुडा-मनमाड पॅसेंजर, हैदराबाद-औरंगाबाद-हैदराबाद पॅसेंजर, निजामाबाद-पंढरपूर-निजामाबाद या पाचही रेल्वे गेल्या एक वर्षापासून एक ते नऊ तासांपर्यंत उशीराने धावत आहे. कधी-कधी तर रेल्वे रद्दच करण्यात येते. त्यामुळे गैरसोय टाळण्यासाठी जालना-मनमाड-जालना, जालना-परभणी-जालना, परभणी-मुदखेड-परभणी, परभणी-परळी-लातूर-परळी-परभणी नवीन डेमू शटल सुरु करण्यात यावी, मेगा ब्लॉक केवळ रविवार अथवा सुट्टीच्या दिवशी घेण्यात यावा,अशी मागणी प्रवाशांनी केली.
या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी प्रवाशांनी आज डोक्याला काळ्या फिती बांधून प्रवास केला. अनेकांनी काळ्या टोप्या, मफलर परिधान केले होते. प्रवाशांनी औरंगाबाद रेल्वेस्टेशनवर जोरदार घोषणा दिल्या. यावेळी रेल्वे प्रवाशी सेना अध्यक्ष संतोषकुमार सोमाणी , रामेश्वर बिलवने पाटील,अंबादास माडवगड ,दादासाहेब घोडके, गोरख गिरी,मनीष मुथा, अरुण भाग्यवान ,कृष्णा सरोवर यांच्यासह महिला, विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
पहा व्हिडीओ :