‘इंडिगो’च्या छत्रपती संभाजीनगर विमानाला उशीर होताच दिल्ली विमानतळावर प्रवाशांचे आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2024 12:09 PM2024-08-02T12:09:19+5:302024-08-02T12:10:02+5:30
दिल्ली- छत्रपती संभाजीनगर विमान : प्रवाशांनी उपोषणाचा पवित्रा घेताच तत्काळ विमानाची व्यवस्था
छत्रपती संभाजीनगर : इंडिगोच्या दिल्ली-छत्रपती संभाजीनगर विमानाला उशीर झाल्याने संताप व्यक्त करीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांसह शहरात येणाऱ्या प्रवाशांनी दिल्लीविमानतळ आंदोलन केल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. यामुळे दिल्ली विमानतळावर काही वेळेसाठी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. प्रवाशांनी उपोषणाचा पवित्रा घेताच तत्काळ विमानाची व्यवस्था करण्यात आल्याचे प्रवाशांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
‘इंडिगो’चे दिल्ली-छत्रपती संभाजीनगर विमान दररोज दिल्लीहून सायंकाळी ४:४५ वाजता उड्डाण घेते आणि ६:३० वाजता शहरात दाखल होते. त्यानंतर सायंकाळी ७ वाजता दिल्लीसाठी उड्डाण घेतले. मात्र, दिल्लीहून येणाऱ्या या विमानास गुरुवारी उशीर झाला. विमानाची वेळ उलटूनही प्रवासी विमानतळावरच होते. याच विमानातून शहरात येण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि भगवान सेनेचे सरसेनापती फुलचंद कराड हेदेखील दिल्ली विमानतळावर होते. विमानाला उशीर होत असल्याचे पाहून त्यांनी इंडिगोच्या कर्मचाऱ्यांना विचारणा केली. मात्र, कोणतेही समाधानकारक उत्तर देत नसल्याचे पाहून त्यांनी विमानतळावर आंदोलन सुरू केले. इतर प्रवासीदेखील त्यांच्यासोबत आले. प्रवाशांचा संताप वाढताच विमानाची व्यवस्था करण्यात आली.
कारण सांगितले नाही, उपोषणाला बसलो
विमान १० मिनिटांत येईल, असे वारंवार सांगून विलंब केला जात होता. विमानाला का उशीर होत आहे, याची विचारणा केल्यावर काहीही सांगितले जात नव्हते. त्यामुळे दिल्ली विमानतळावर उपोषणाला बसलो. तेव्हा इतर प्रवासीही माझ्यासोबत बसले. मला अटक करण्याचाही प्रयत्न केला. परंतु त्यानंतर तत्काळ विमानाची व्यवस्था करण्यात आली. हे विमान सायंकाळी ७:१० वाजेच्या सुमारास शहरात आले. वेळ वाचविण्यासाठी विमानाने प्रवास केला जातो. त्यामुळे विनाकारण विलंब होता कामा नये.
-फुलचंद कराड, नेते, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष
नागपूर, मुंबई विमानालाही उशीर
इंडिगोच्या नागपूर विमानाला जवळपास दीड तास उशीर झाला. सायंकाळी ४:४० वाजता उड्डाण घेणाऱ्या विमानाने सायंकाळी ६ वाजता उड्डाण घेतले. त्याबरोबर मुंबई विमानालाही उशीर झाला. इंडिगोच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.