प्रवाशांची तारांबळ सुरूच
By Admin | Published: March 17, 2016 12:23 AM2016-03-17T00:23:39+5:302016-03-17T00:23:55+5:30
औरंगाबाद : शहरात आॅटोरिक्षांसाठी करण्यात आलेल्या ‘मीटर सक्ती’चा फटका सर्वसामान्य प्रवासी, महाविद्यालयीन विद्यार्थी, परीक्षार्थी, कामगार, मजुरांना बसत आहे.
औरंगाबाद : शहरात आॅटोरिक्षांसाठी करण्यात आलेल्या ‘मीटर सक्ती’चा फटका सर्वसामान्य प्रवासी, महाविद्यालयीन विद्यार्थी, परीक्षार्थी, कामगार, मजुरांना बसत आहे. सीटर रिक्षातून प्रवास करताना पूर्वी १० ते २० रुपये द्यावे लागत होते. परंतु आता ७० ते १०० रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. त्यामुळे शहर बसचा आधार घेण्यावर भर दिला जात आहे. परंतु अपुऱ्या संख्येमुळे प्रत्येक बस प्रवाशांच्या गर्दीने खचाखच भरून धावत आहेत.
मीटर सक्तीच्या दुसऱ्या दिवशीही हीच परिस्थिती कायम होती. पोलिसांकडून होणाऱ्या कारवाईच्या धाकामुळे बहुतांश रिक्षाचालक सीटरने जाण्यास नकार देत आहेत. त्यामुळे पूर्वी १० ते २० रुपयांत होणाऱ्या प्रवासासाठी ७० ते १०० रुपये मोजण्याची वेळ प्रवाशांवर येत आहे. याचा सर्वाधिक फटका कामगार, मजूर आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे. दोन वेळच्या प्रवासासाठी दररोज १०० ते २०० रुपये क से खर्च करता येतील, असा प्रश्न विद्यार्थ्यांनी उपस्थित केला. तर दिवसभराची मजुरी ३०० रुपयांपर्यंत असताना केवळ रिक्षाला १००-१५० रुपये मोजून घर खर्च कसा भागविणार, असा प्रश्न विचारला जात आहे. अशात पर्याय असलेल्या शहर बसेस वेळेवर येत नाहीत. किफायतशीर प्रवासासाठी शहर बसेसची संख्या वाढविण्याची गरज आहे, असे काही कामगारांनी सांगितले.