१०० रुपयांत दुचाकीची पासिंग !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 12:09 AM2017-10-30T00:09:31+5:302017-10-30T00:09:44+5:30
वाहन न पाहताच एआरटीओ कार्यालयातील वाहन निरीक्षकांकडून नोंदणी केली जात आहे. यासाठी दलालांमार्फत १०० रुपये कमिशन वसूल केले जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : वाहन न पाहताच एआरटीओ कार्यालयातील वाहन निरीक्षकांकडून नोंदणी केली जात आहे. यासाठी दलालांमार्फत १०० रुपये कमिशन वसूल केले जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. याकडे मात्र वरिष्ठांकडून ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप होत आहे.
मागील काही वर्षांपासून दुचाकीच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. या दुचाकीची नोंदणी करण्यासाठी कार्यालयाकडून आॅनलाईन पद्धत कार्यान्वित करण्यात आली; परंतु दलाल हटविण्यात मात्र त्यांना यश आले नाही. हेच दलाल आज एआरटीओ कार्यालयातील अधिकारी, कर्मचा-यांना ‘अर्थपूर्ण’ सहकार्य करीत आहेत. त्यामुळेच दिवसेंदिवस कार्यालयातील अधिकृत वसुली थंडावली असून, अनधिकृत वसुली वाढली आहे. यामुळे कार्यालयाची प्रतिमा सर्वसामान्यांत मलीन होत चालली आहे.
नवीन वाहन खरेदी घेतल्यानंतर संबंधित वाहन निरीक्षकाने त्या वाहनाची तपासणी करून पासिंग करणे गरजेचे आहे. परंतु असे होत नाही. शहरातील जवळपास सहा दुचाकी शोरूममध्ये दलालांची नियुक्ती केली आहे. हेच दलाल अधिकाºयांना पाहुणचार करण्यासोबतच सर्वसामान्यांची आर्थिक लूट करीत वाहन नोंदणी करून देत आहेत. अनेक वेळा तर आष्टी, पाटोदा, शिरूर, गेवराई या भागांतील गाड्यांची नोंदणी कार्यालयात बसून केली जाते. त्यामुळे येथील सर्व कारभार दलालांच्या भरवशावर चालत असल्याचे दिसून येते. याला अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप केला जात आहे.