मराठवाड्याबद्दल अतीव आस्था, येथील गुणवत्तावाढीच्या कार्यात सदैव सोबत असेल: शरद पवार
By सुमेध उघडे | Published: November 19, 2022 03:27 PM2022-11-19T15:27:38+5:302022-11-19T15:33:02+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या ६२ व्या दीक्षांत समारंभात शरद पवार आणि नितीन गडकरी यांना डिलीट पदवीने सन्मानित करण्यात आले
औरंगाबाद: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळामध्ये शैक्षणिक कामात प्रगती नसतांना येथे लक्ष घातले आणि मिलिंदच्या माध्यमातून शिक्षण दिले. महाराष्ट्राला अभिमान वाटावा असे हे विद्यापीठ आहे. याच्या निर्मितीपासूनचा कालखंड मला आठवतो. याच्या जडणघडणीत माझा समावेश होता याचा आनंद आहे. आज विद्यापीठाने डिलीट पदवी प्रदान केली यासाठी अंतकरणापासून आभारी आहे. नितीन गडकरी आणि माझ्या कामाची दखल घेतली गेली यासाठी कृतज्ञता व्यक्त करतो, अशा भावना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केल्या.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या ६२ व्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते. पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, या विद्यापीठाच्या स्थापनेत माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा मोठा वाटा आहे. या भागात विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय नेतृत्वाने घेऊन संपूर्ण मराठवाड्याच्या शिक्षणाचे दालन खुले झाले. विद्यापीठासाठी संघर्ष झाला. याचा भागात आणखी एक विद्यापीठ स्थानक करण्याच्या प्रक्रियेत माझा सहभाग होता याचा आनंद आहे. यामुळे येथे शैक्षणिक दालन खुले झाले.
उसावरील संशोधनासाठी जालन्यात केंद्र
मराठवाड्याची शेती बदलत आहे. पहिले फक्त कापूस, बाजरी होती. आता ऊस उत्पादनात मराठवाडा राज्यात अग्रेसर आहे. देश पातळीवरील उसावर संशोधन करणाऱ्या संस्थेचे अध्यक्षपद माझ्याकडे आहे. याच माध्यमातून मराठवाड्यात उसाच्या शेतात क्रांती घडवणारी आणि तांत्रिक सुविधा देणारी संस्था सुरू करण्यासाठी जालना येथे 100 एकर जमीन खरेदी करून काम सुरू करतो आहे. त्यानंतर नितीन गडकरी यांच्या मदतीने नागपूर येथे या प्रकारचे केंद्र लवकरच सुरु होईल.
गुणवत्तावाढीसाठी सदैव सोबत
मला शैक्षणिक संस्थानची काळजी वाटते. त्यामुळे दर्जा सुधारण्याची गरज आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर सिद्ध करायचे असेल तर आपल्याला शैक्षणिक दर्जा सुधारावा लागेल. हे सर्व करण्यात सर्वात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अग्रेसर राहील, अशी अपेक्षा व्यक्त करतो. आपण सर्व क्षेत्रात कसे आघाडीवर राहू याची काळजी घेऊ. आपल्यातील, मराठवाड्यासाठी अतीव आस्था असलेल्या सहकारी म्हणून गुणवत्ता वाढीसाठी कशी दोन पाऊले पुढे टाकू आणि यशस्वी होऊ या कार्यात सोबत राहील याचा विश्वास देतो, अशी ग्वाही देतो असेही शरद पवार म्हणाले.