पासचा अपहार ; वाहतूक नियंत्रक निलंबित
By Admin | Published: May 31, 2016 11:16 PM2016-05-31T23:16:42+5:302016-05-31T23:20:40+5:30
लातूर : परिवहन महामंडळाच्या लातूर आगाराअंतर्गत त्रैमासिक पासमध्ये मोठ्या प्रमाणात अपहार झाल्याचे उघड झाले आहे़ प्रथम चौकशीत २५ पासमधील रकमेचा अपहार झाल्याचे निष्पन्न झाले आहे़
लातूर : परिवहन महामंडळाच्या लातूर आगाराअंतर्गत त्रैमासिक पासमध्ये मोठ्या प्रमाणात अपहार झाल्याचे उघड झाले आहे़ प्रथम चौकशीत २५ पासमधील रकमेचा अपहार झाल्याचे निष्पन्न झाले आहे़ त्यामुळे वाहतूक नियंत्रक अजित बोयणे यांना आगार प्रमुखांनी निलंबीत केले आहे़ या वाहतूक नियंत्रकाने आत्तापर्यंत दिलेल्या सर्व पासेसची तपासणी केली जात असून, त्यात असाच दोष आढळल्यानंतर पोलिस कारवाई केली जाणार आहे़
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या लातूर विभागाअंतर्गत निलंगा व उदगीर या ठिकाणीही वर्षभरापुर्वी त्रैमासिक पासमध्ये अपहार झाला होता़ या प्रकरणी संबंधितांवर कारवाई ही करण्यात आली होती़ या घटनेला वर्ष उलटले नाही़ तोपर्यतच लातूर आगारातही त्रैमासिक पासमध्ये अपहार झाल्याचे समोर आले आहे़ सोमवारी केलेल्या तपासणीमध्ये २५ पासमध्ये अपहार केल्याचे उघड झाले आहे़ उर्वरीत पासचीही तपासणी सुरुच आहे़
या बरोबरच इतर विभाग नियंत्रकांनीही दिलेल्या पासची सखोल चौकशी सुरु करण्यात आली आहे़ या चौकशीनंतरच अपहारातील लाखोंचा आकडा समोर येणार आहे़ शासन परिपत्रकानुसार मासिक, वार्षिक, त्रैमासिक पाससाठी स्मार्ट कार्डचा वापर करण्याचे आदेश दिले असतानाही शासनाच्या आदेशाचे उल्लंघन करून २०११ पासून हस्तलिखीतच पास देण्याचा पायंडा लातूर आगाराने कायम ठेवला आहे़ हा पायंडा तत्कालिन आगारप्रमुख व स्थानकप्रमुख यांच्या आदेशाने सुरु ठेवला असल्याने या अपहारामुळे त्यांचाही हात आहे की काय अशी शंका एसटी महामंडळातील अधिकारी, कर्मचाऱ्यांतून उपस्थित केली जात आहे़
या झालेल्या अपहाराबद्दल लेखाधिकाऱ्यांनाही माहिती झाली होती़ तरीही या बाबत वरीष्ठांकडे तक्रार न करता तेही चीडीचुप बसले असल्याचे दिसून येत आहे़ प्रथम दर्शनी या अपहारामध्ये वाहतूक नियंत्रक अजित बोयणे याच्यावर निलंबणाची कारवाई झाली असली तरी या अपहारामध्ये अप्रत्यक्षपणे सहभागी असलेल्या इतर अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावरही कारवाई होणे आवश्यक आहे़
परंतू या प्रकरणाकडे वरीष्ठ अधिकाऱ्यांकडून डोळे झाक केली जात आहे़ वाहतूक नियंत्रकाकडून झालेल्या अपहार प्रकरणी चौकशीअंती गुन्हा दाखल करणार असल्याचे आगार प्रमुखांकडून सांगितले जात असले तरी या प्रकरणात गुंतलेल्या इतर अधिकाऱ्यांकडे डोळेझाक केली जात असल्याचे दिसून येत आहे़