पासपोर्टसाठी पोलिस व्हेरिफिकेशन विलंबाने, उमेदवार ठाण्यातच मारतात चकरा
By साहेबराव हिवराळे | Published: March 19, 2024 07:46 PM2024-03-19T19:46:30+5:302024-03-19T19:46:40+5:30
पोलिस व्हेरिफिकेशन तत्काळ झाल्यास ८ ते १० दिवसांत पासपोर्ट नागरिकांच्या हातात येईल, असा दावा टपाल कार्यालयाने केला
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर टपाल कार्यालयात पासपोर्ट सेवा केंद्र सुरू केल्याने स्थानिक नागरिकांना त्यांचा पासपोर्ट काढण्यासठी मुंबईच्या चकरा मारण्याची कसरत थांबलेली आहे. सध्या प्रतिदिवस ८० जणांच्या मुलाखतीची व्यवस्था असल्याने पोलिस व्हेरिफिकेशन तत्काळ झाल्यास ८ ते १० दिवसांत पासपोर्ट नागरिकांच्या हातात येईल, असा दावा टपाल कार्यालयाने केला आहे. परंतु, काही प्रकरणात दीड महिन्यापर्यंत पोलिस व्हेरिफिकेशनला विलंब होत असल्याने चकरा माराव्या लागतात.
पासपोर्ट कार्यालयात ऑनलाइन अर्ज नोंदणीनुसार पूर्वी दोन महिन्यांची 'वेटिंग' होती; परंतु आता शनिवारीदेखील कामकाज सुरू असल्याने ती आता दीड महिन्यावर आली आहे. अधिकचे टेबल वाढविण्याचा प्रस्ताव होता; परंतु प्रत्यक्षात तशा काही हालचाली घडल्या नव्हत्या, आता कार्यालयातील यंत्रणा वाढविण्यात आलेली असली तरी पोलिस व्हेरिफिकेशनलाच वेळ होतो आहे. लिंक असलेल्या मोबाइलवर पासपोर्ट संदर्भातील संदेश येतात, परंतु जानेवारीत मुलाखत देऊनही अनेकांचे व्हेरिफिकेशन झालेले नाही.
स्मार्ट शहरात अधिक 'स्मार्ट' काम व्हावे, यासाठी गती वाढविण्याची आवश्यकता आहे, असे पासपोर्ट लाभधारकांचे मत आहे. स्मार्ट सिटी छत्रपती संभाजीनगरात उद्योग तसेच शैक्षणिक कारणासाठी देश-विदेशात ये-जा करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. शहरातून परदेशी जाण्यासाठी अनेक जण इच्छुक असतात. शहरातून परदेशी जाणारेही वाढत असल्याने या कार्यालयाकडून तत्काळ पासपोर्ट उपलब्धतेविषयी अचूक काळजी घेतली पाहिजे, अशी मागणी शहरवासीयांकडून होत आहे.
पासपोर्ट कार्यालयात चाचपणी
ऑनलाइन देण्यात आलेल्या मुलाखती वेळेत केल्या जातात. त्यात कोणताही विलंब नाही, परंतु कागदपत्रातील त्रुटी वगळता इतर उमेदवारांच्या मुलाखती करून घेतल्या जातात. पोलिस यंत्रणेत अडकल्याच्या तक्रारी उमेदवारांनी केल्याचे समजते. इतर जिल्ह्यातील टॅग सिस्टमप्रमाणे काम व्हावे.
- प्रवर डाक अधीक्षक जी. हरी प्रसाद.
कायदा व सुव्यवस्थेमुळे थोडाफार विलंब..
शहरात कायदा व सुव्यवस्थेला महत्त्व द्यावे लागते. आंदोलने असतात. आता आचारसंहिता आली आहे. पोलिस ठाण्यात आलेल्या पासपोर्ट अचूक व्हेरिफिकेशन तत्काळ निकाली काढले जातात. पेंडिंग ठेवत नाहीत असे पोलिस अधिकारी म्हणाले.