साईबाबांच्या ‘पादुका दर्शन’ यात्रेचा मार्ग मोकळा; विरोधातील याचिका फेटाळली
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 12:42 IST2025-04-10T12:39:46+5:302025-04-10T12:42:01+5:30
आजपासून सुरू होणार शिर्डी ते तामिळनाडूपर्यंतचा साईबाबांच्या पादुकांचा दर्शन सोहळा

साईबाबांच्या ‘पादुका दर्शन’ यात्रेचा मार्ग मोकळा; विरोधातील याचिका फेटाळली
छत्रपती संभाजीनगर : श्री साईबाबांच्या मूळ (चर्म) पादुका शिर्डीबाहेर नेण्यास विरोध करणारा दिवाणी अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. मंगेश पाटील आणि न्या. प्रफुल्ल खुबाळकर यांनी बुधवारी नामंजूर केला. परिणामी श्री साईबाबा संस्थानच्या तदर्थ समितीने घेतलेल्या निर्णयानुसार गुरुवार (दि.१० एप्रिल) पासून शिर्डी ते २६ एप्रिलला पुलीयमपट्टी (तामिळनाडू) पर्यंतचा ‘श्री साई पादुकादर्शन सोहळा’ सुरू होण्याचा मार्ग सुकर झाला आहे.
कोपरगाव येथील संजय भास्कर काळे यांनी दाखल केलेल्या दिवाणी अर्जात म्हटल्यानुसार श्री साईबाबा संस्थानच्या तदर्थ समितीने २९ नोव्हेंबर २०२४ च्या बैठकीत श्री साईबाबांच्या मूळ (चर्म) पादुका विविध संस्थांना पादुका दर्शन सोहळ्यासाठी गावोगावी पाठविण्याचा निर्णय घेतला. काळे यांनी औरंगाबाद खंडपीठात दिवाणी अर्ज दाखल करून श्री साईबाबांच्या मूळ पादुका शिर्डीबाहेर नेण्यास विरोध केला.
याचिकेत म्हटल्यानुसार बाबांच्या मूळ (चर्म) पादुका आणि बाबांनी वापरलेले कपडे, भांडी व इतर वस्तू ११० वर्षांपेक्षा जादा जुन्या आहेत. या वस्तू संस्थानने पुरातत्त्व खात्याच्या मार्गदर्शनाखाली जतन केल्या आहेत. चर्म पादुकांचे ऊन, पाणी, थंडी, वातावरणातील बदल, सोहळ्या ठिकाणी अनुचित प्रकार अथवा अपघात यापासून संरक्षण करणे आवश्यक आहे. यासाठी समितीने पुरातत्त्व खात्याची व उच्च न्यायालयाची परवानगी घेणे आवश्यक आहे. पादुका अल्प काळासाठी नियंत्रित वातावरणातून बाहेर नेण्यात न भरून येणाऱ्या नुकसानाचा धोका आहे.
संस्थानचे दैनंदिन कामकाज व्यवस्थित चालावे यासाठी न्यायालयाने तदर्थ समिती स्थापन केली. समितीला धोरणात्मक अथवा आर्थिक निर्णय घेण्याचा अधिकार नाही. संस्थानने नियोजित पादुका दर्शन सोहळा बंद करण्याचे निर्देश देण्याची विनंती याचिकेद्वारे केली होती. शिर्डी संस्थानतर्फे ॲड. अनिल बजाज यांनी काम पाहिले, त्यांना ॲड. विधान खिंवसरा आणि ॲड. राम मालाणी यांनी सहकार्य केले.
पादुका दर्शन सोहळ्याचा मार्ग
१० एप्रिलला शिर्डी ते सांगली, पेठ वडगाव, दावनगेरे-कर्नाटक, बंगळुरू, मल्लेश्वरम, सेलम-तामिळनाडू, करुर, पुलीयमपट्टी, धर्मापुरी आणि तेथून २६ एप्रिलला पुन्हा शिर्डीपर्यंत सुमारे १७१५ कि. मी. चा प्रवास करून साईभक्तांना पादुका दर्शन दिले जाईल.