राष्ट्रवादीचे बंडखोर नगरसेवक ‘एमआयएम’च्या वाटेवर
By Admin | Published: July 25, 2016 12:07 AM2016-07-25T00:07:41+5:302016-07-25T00:42:25+5:30
बीड :राष्ट्रवादी काँग्रेसमधील डझनभर नगरसेवकांनी तीन महिन्यांपूर्वी बंडाचे निशाण फडकावले होते. त्यापैकी काही जण एमआयएमच्या वाटेवर आहेत.
बीड :राष्ट्रवादी काँग्रेसमधील डझनभर नगरसेवकांनी तीन महिन्यांपूर्वी बंडाचे निशाण फडकावले होते. त्यापैकी काही जण एमआयएमच्या वाटेवर आहेत. २६ जुलैचा मुहूर्तही यासाठी ठरला असून, ईद मिलाप कार्यक्रमात यावर शिक्कामोर्तब करण्यात येणार आहे.
माजी उपनगराध्यक्ष व राष्ट्रवादीचे बीड विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष मोईन मास्टर, राकाँतर्फे बिनविरोध निवडून गेलेल्या नगरसेविका शकिला बेगम यांची नावे सर्वांत पुढे आहेत. शकिला बेगम यांचे पती शेख निजाम हे सध्या शिवसंग्रामच्या तंबूत आहेत. ते एमआयएममध्ये गेल्यास राष्ट्रवादीप्रमाणेच शिवसंग्रामलाही खिंडार पडणार आहे.
२६ जुलै रोजी बीडमधील बशीरगंज भागात प्रवेशाचा जाहीर कार्यक्रम होणार आहे. यावेळी एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष सय्यद मोईन हे हजेरी लावणार आहेत. त्यामुळे याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. तथापि, डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांचे पालिकेत वर्चस्व आहे. डझनभर नगरसेवकांचे बंड व पुतणे जि.प. सभापती संदीप क्षीरसागर यांनी पालिकेत घातलेले लक्ष यामुळे आधीच डॉ. क्षीरसागर यांची अडचण वाढली आहे. आता बंडखोर नगरसेवकांनी ‘एमआयएम’चा रस्ता पकडल्याने पालिका निवडणुकीच्या तोंडावर राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणावर बदलतील. (प्रतिनिधी)