१ मिनिट ४५ सेकंदांत रुग्ण दाखल! मेल्ट्रॉन हॉस्पिटल येथे मॉक ड्रील यशस्वी
By मुजीब देवणीकर | Published: April 11, 2023 02:12 PM2023-04-11T14:12:16+5:302023-04-11T14:40:36+5:30
रुग्णवाहिकेमधून अपघात विभागात एखाद्या रुग्णाला भरती करण्यासाठी किती वेळ लागतो, याची रंगीत तालीम करण्यात आली.
छत्रपती संभाजीनगर : शहरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. एप्रिल आणि मे महिन्यात कोरोना रुग्णांचा उद्रेक झाला, आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाल्यास ऐनवेळी धावपळ होऊ नये म्हणून सोमवारी मेल्ट्रॉन हॉस्पिटल येथे मॉक ड्रील घेण्यात आली. रुग्णाला वेळेत पोहोचविणे, त्वरित औषधोपचार सुरू करणे याची तपासणी करण्यात आली. ही चाचणी यशस्वी झाल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे.
मॉक ड्रीलमध्ये ऑक्सिजन सिलिंडर, ऑक्सिजन मेनिफोल्ड, ऑक्सिजन पाइपलाइनची तपासणी करण्यात आली. बेडसाइड मॉनिटर्स, व्हेंटिलेटर्स, औषधी, साहित्याची उपलब्धता तपासण्यात आली. कोणत्याही आणीबाणीच्या प्रसंगास समर्थपणे तोंड देण्यास आरोग्य विभाग सज्ज असल्याचे सांगण्यात आले. रुग्णवाहिकेमधून अपघात विभागात एखाद्या रुग्णाला भरती करण्यासाठी किती वेळ लागतो, याची रंगीत तालीम करण्यात आली. डिसेंबरमध्ये झालेल्या मॉक ड्रीलच्या तुलनेत सुधारणा दिसून आली. केवळ १.४५ मिनिटांमध्ये रुग्ण भरती करण्यात आला.सिडको एन-११ रुग्णालय, सिडको एन-८ रुग्णालय, नेहरूनगर रुग्णालय, ईओसी पदमपुरा येथे मॉक ड्रील घेण्यात आली. याप्रसंगी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा, डॉ. बी. डी. राठोडकर, आढाव, अमोलिक, शर्मा, बोरडे व इतर सर्व कर्मचारी उपस्थित होते.
कोरोनाच्या रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढत आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी घाटी आणि जिल्हा सामान्य रुग्णालयात माॅक ड्रिल घेऊन ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटच्या परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. जिल्हा रुग्णालयातील माॅक ड्रिलप्रसंगी सहायक उपसंचालक डाॅ. भूषणकुमार रामटेके, जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. दयानंद मोतीपवळे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. पद्मजा सराफ आदी उपस्थित होते. घाटीत ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर सज्ज असल्याचे अधिष्ठाता डाॅ. संजय राठोड यांनी सांगितले.