corona virus : स्वच्छतागृहात कोरोना रुग्ण कोसळला; दरवाजा तोडून काढले बाहेर, पण दुर्दैवाने मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 12:17 PM2021-03-30T12:17:29+5:302021-03-30T13:00:10+5:30
corona virus in Aurangabad : गुलाबराव ढवळे (६५, रा. जयभवानीनगर) असे मयत रुग्णाचे नाव आहे. कोरोनाच्या उपचारासाठी त्यांना २७ मार्च रोजी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
औरंगाबाद : ऑक्सिजनवर असलेला कोरोना रुग्ण स्वच्छतागृहात गेला. मात्र, अचानक स्वच्छतागृहातच रुग्णाची प्रकृती खालावली. बराच वेळ झाल्यानंतरही रुग्ण बाहेर आला नसल्याचे लक्षात येताच दरवाजा तोडून रुग्णाला बाहेर काढून आयसीयूत हलविण्यात आले. मात्र, दुर्दैवाने रुग्णाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी पहाटे जिल्हा सामान्य रुग्णालयात घडली. दरम्यान, रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
गुलाबराव ढवळे (६५, रा. जयभवानीनगर) असे मयत रुग्णाचे नाव आहे. कोरोनाच्या उपचारासाठी त्यांना २७ मार्च रोजी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात दाखल होतानाच ऑक्सिजनची पातळी कमी होती. त्यामुळे ते ऑक्सिजनवर होते. दरम्यान सोमवारी पहाटे ते स्वच्छतागृहात गेले. त्यांना स्वच्छतागृहात जाऊन खूप वेळ झाला, तरीही ते बाहेर आले नसल्याची बाब अन्य रुग्ण, कर्मचाऱ्यांच्या लक्षात आली. त्यांनी स्वच्छतागृहाचा दरवाजा वाजविला. परंतु आतून काहीही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे दरवाजा तोडून त्यांना आयसीयूत दाखल करण्यात आले. परंतु सकाळी ७.४० वाजता गुलाबराव ढवळे यांचा मृत्यू झाला. दरम्यान, कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळेच ही दुर्दैवी घटना घडली असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. या प्रकरणी दोषी असलेल्या कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, त्यांना निलंबित करावे, अशी मागणी रुग्णाचा मुलगा निलेश ढवळे यांनी केली आहे.
उपचारादम्यान मृत्यू
सदर रुग्ण पहाटे ५.३० वाजता स्वच्छतागृहाला गेला होता. पण आतमध्ये गेल्यानंतर सकाळी ६ वाजेपर्यंतही ते बाहेर आले नाही. ही बाब लक्षात येताच दार तोडून त्यांना बाहेर काढले. तेव्हा आधारासह खाटेपर्यंत ते चालत आले. त्यांच्यावर आयसीयूत तात्काळ उपचार करण्यात आले. प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. त्यांना व्हेंटिलेटरही लावण्यात आले. पण त्यांचा मृत्यू झाला.
- डाॅ. सुंदर कुलकर्णी, जिल्हा शल्यचिकित्सक