रुग्ण वाढल्याने रोज लागतो दीड कोटी लिटर लिक्विड ऑक्सिजन; पुरवठा मर्यादित असल्याने रुग्णालयांची धावाधाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2020 03:30 PM2020-09-11T15:30:00+5:302020-09-11T15:41:10+5:30

लिक्विड ऑक्सिजनच्या मागणी व पुरवठ्यात ३ दिवसांचे अंतर

As the patient grows, 1.5 crore liters of liquid oxygen is required daily; Due to the gap between supply and demand, hospitals are running out | रुग्ण वाढल्याने रोज लागतो दीड कोटी लिटर लिक्विड ऑक्सिजन; पुरवठा मर्यादित असल्याने रुग्णालयांची धावाधाव

रुग्ण वाढल्याने रोज लागतो दीड कोटी लिटर लिक्विड ऑक्सिजन; पुरवठा मर्यादित असल्याने रुग्णालयांची धावाधाव

googlenewsNext
ठळक मुद्देपुरवठ्यावर मर्यादा आल्याने लिक्विड ऑक्सिजनसाठी रुग्णालयांची धावाधाव तुटवडा नाही, तरी यापुढे पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी मोठी कसरत

- योगेश पायघन 

औरंगाबाद : कोरोनाबाधित रुग्णांकरिता ऑक्सिजनचा वापर नेहमीपेक्षा पाच ते सहापट वाढला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ऑक्सिजन सुविधा असलेल्या सुमारे ११०० खाटांवर उपचार घेत असलेल्या रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा करण्यात वैद्यकीय यंत्रणेसह उत्पादक, पुरवठादारांनाही मर्यादा पडू लागल्या आहेत. सध्या तुटवडा नसला तरी बहुतांश रुग्णालयांची मदार द्रवरूप ऑक्सिजनवर असून पुणे मुंबईतून मागणी केल्यावर तिसऱ्या दिवशी पुरवठा होत आहे. त्यामुळे सध्या ऑक्सिजन पुरवठ्याची मदार जिल्ह्यातील उपलब्ध उत्पादक प्लांट, साठवणुकीवरच आहे. त्यामुळे पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी उत्पादक, पुरवठादार, रुग्णालयांची धावपळ सुरू आहे.

द्रवरूप ऑक्सिजनचा पुरवठा पुणे व मुंबईतून प्रत्येकी २ अशा ४ कंपन्या करतात. तर शहरालगत ३ प्लांट आहेत. ३ पैकी वाळूज आणि गेवराई तांडा येथील प्लांट ८० टक्के वैद्यकीय ऑक्सिजनचा पुरवठा करतात. तर तिसरा प्लांट केवळ औद्योगिक ऑक्सिजन पुरवठा करतो. लिक्विड ऑक्सिजनच्या राज्यभरातून वाढलेल्या मागणीमुळे पुरवठ्यावर प्रचंड ताण आहे. त्यात शहरातील रुग्णालयांचा ९० टक्के भार लिक्विड ऑक्सिजनवर आहे. याच पद्धतीने रुग्णसंख्या वाढत राहिल्यास १५ दिवसांनंतर उद्भवणाऱ्या परिस्थितीबद्दल रुग्णालयांनी ऑक्सिजन पुरवठ्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. 

पूर्वी ज्या रुग्णालयात एक जंबो सिलिंडर दोन तास चालत असे कोरोना रुग्णांना हाय फ्लोने ऑक्सिजन लागत असल्याने अवघ्या १० मिनिटांत सिलिंडर रिकामे होत आहे. जेथे मागणी १० सिलिंडर होती. तेथील मागणी ६० ते ७० सिलिंडर झाली असल्याने पुरवठ्यासाठी रात्रीचा दिवस करावा लागत असल्याचे पुरवठादारांनी लोकमतला सांगितले. औषध प्रशासनाचे सहआयुक्त संजय काळे यांनी वरिष्ठ अधिकारी व प्रशासनाला माहिती पाठवण्यात व्यस्त असल्याचे सांगून ऑक्सिजन मागणी व पुरवठ्यासंबंधी बोलण्याचे टाळले.

१ कोटी ५८ लाख ४० हजार लिटर ऑक्सिजन लागतो २४ तासांत
क्रिटिकल रुग्णाला ३० लिटर प्रतिमिनिटप्रमाणे २४ तासांत ४३ हजार लिटर आॅक्सिजन लागतो. तर मध्यम रुग्णाला १० लिटर दर मिनिटानुसार १४ हजार ४०० लिटर आॅक्सिजन लागत आहे. सध्या जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या बाधितांपैकी सुमारे ११०० रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासत आहे. किमान गरजेचा विचार केल्यास १४ हजार ४०० प्रतिरुग्णाचा २४ तासांतील वापर लक्षात घेतल्यास १ कोटी ५८ लाख ४० हजार लिटरपेक्षा अधिक आॅक्सिजन दररोज वापरला जात आहे. त्यातही अडीचशेहून अधिक रुग्ण जे व्हेंटिलेटर व हाय फ्लो ऑक्सिजनवर आहेत. त्यांना किमान आवश्यकतेच्या तिप्पट ऑक्सिजनची गरज भासते, असे तज्ज्ञांनी 
सांगितले.

औरंगाबादेतील ३ पैकी दोनच प्लांटमधून वैद्यकीय आॅक्सिजन पुरवठा
रात्री ११ ते सकाळी ५ वाजेपर्यंत टँकरची वाहतूक बंद
वेळोवेळी वीज खंडित होत असल्याने रीफिलिंगवर परिणाम
दोन प्लांटमधून दिवसभरात दीड हजार सिलिंडरची रीफिलिंग
मागणी दिवसाकाठी अडीच हजार सिलिंडरची
लिक्विड आॅक्सिजन नसल्यास भिस्त केवळ जंबो सिलिंडरवर

दोनच उत्पादकांकडून ८० टक्के वैद्यकीय ऑक्सिजन
३ पैकी २ उत्पादक वैद्यकीय ऑक्सिजनचा ८० टक्के  पुरवठा करत आहेत. सध्याची गरज लक्षात घेऊन उपलब्ध तिन्ही प्लांटमधून सध्यातरी १०० टक्के वैद्यकीय आॅक्सिजनचा पुरवठा गरजेचा आहे. लिक्विड आॅक्सिजन पुरवठा करणारे टँकर रात्री ११ ते सकाळी ५ पर्यंत वाहतूक करत नाहीत. हा कंपनीचा नियम असला तरी सध्याच्या आपत्कालीन परिस्थितीत रात्रीही वाहतूक झाल्यास पुरवठ्यात खंड पडणार नाही. वारंवार वीज खंडित होणेही पुरवठ्यावर परिणाम करत आहे. तसेच बीड, जळगाव, नगर, धुळे, मालेगाव, बुलडाणा येथील पुरवठादार जुने असले तरी तेथील वाढलेल्या मागणीचाही जिल्ह्याच्या कोट्यावर परिणाम दिसून येत आहे. -एक आॅक्सिजन पुरवठादार

मागणी व पुरवठ्यात  ३ दिवसांचे अंतर
मागणी झालेल्या दिवशी लिक्विड आॅक्सिजनचा पुरवठा होणे अपेक्षित आहे. पुणे, मुंबईत उत्पादन पूर्ण क्षमतेने होत असले तरी मागणी वाढली असल्याने तेथून पुरवठ्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे मागितलेल्या दिवशी लिक्विड ऑक्सिजनचा पुरवठा होत नाही. रीफिलर, डीलरची मागणी आणि पुणे, मुंबईहून येणाऱ्या लिक्विड आॅक्सिजनमध्ये सध्या तीन दिवसांचा फरक आहे. मागणी केली त्याच दिवशी पुरवठा मिळाल्यास पुरवठ्यातील अडचणी दूर होतील. त्यासाठी प्रयत्न गरजेचे आहेत.
- राजकुमार चोपडा, गॅस उत्पादक

Web Title: As the patient grows, 1.5 crore liters of liquid oxygen is required daily; Due to the gap between supply and demand, hospitals are running out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.