जिल्हा रुग्णालयात रुग्णांचा श्वास ‘सिलिंडरवरच’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:02 AM2021-04-19T04:02:16+5:302021-04-19T04:02:16+5:30
औरंगाबाद : जिल्हा सामान्य रुग्णालयात १४ मार्च रोजी लिक्विड ऑक्सिजन टँक प्रकल्पाचे भूमिपूजन झाले. परंतु महिना उलटूनही हे काम ...
औरंगाबाद : जिल्हा सामान्य रुग्णालयात १४ मार्च रोजी लिक्विड ऑक्सिजन टँक प्रकल्पाचे भूमिपूजन झाले. परंतु महिना उलटूनही हे काम पूर्ण झालेले नाही. जिल्हा रुग्णालयाच्या आवारात टँक पडून आहे. परिणामी, या ठिकाणी कोरोना रुग्णांना अद्यापही सिलिंडरद्वारेच ऑक्सिजन पुरविण्याची कसरत करावी लागत आहे.
जिल्हा रुग्णालयात कोरोना रुग्णांसाठी ३०० खाटांची व्यवस्था केलेली आहे. जिल्हा रुग्णालयातील तळमजल्यात ऑक्सिजन सिलिंडरची यंत्रणा आहे. या ठिकाणी २४ तास एक सिलिंडर रिकामे झाले की दुसरे सिलिंडर लावावे लागते. यात वेळ आणि श्रम जातो. त्यातही अनेकदा सिलिंडर वेळेवर मिळत नसल्याने गंभीर परिस्थितीलाही तोंड द्यावे लागते. त्यामुळे रुग्णालयाच्या परिसरात ऑक्सिजन टँक बसविण्याचा निर्णय घेतला. परंतु भूमिपूजन होऊन महिना होऊनही लिक्विड ऑक्सिजन टँक बसू शकला नाही. रुग्णालयासाठी पुरेसे सिलिंडर उपलब्ध असून टँकचे काम लवकरच पूर्ण होईल, असे जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. एस. व्ही. कुलकर्णी यांनी सांगितले.
‘एसएसबी’मध्ये वाढणार १२५ बेड
घाटीतील सुपर स्पेशालिटी ब्लाॅकसाठी (एसएसबी) १० हजार लीटर क्षमतेचा लिक्विड ऑक्सिजन टँक आहे. विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांनी घाटी प्रशासनाला बेड वाढविण्याची सूचना केली आहे. त्यानुसार ‘एसएसबी’ला आता १० हजार लीटर क्षमतेचा आणखी एक लिक्विड ऑक्सिजन टँक बसविण्यात येत आहे. या टँकमुळे या ठिकाणी १०० ऑक्सिजन बेड आणि २५ आयसीयू बेड वाढतील. अधिष्ठाता डाॅ. कानन येळीकर, घाटीतील सुपर स्पेशालिटी ब्लाॅक विशेष कार्य अधिकारी डाॅ. सुधीर चौधरी यासाठी प्रयत्न करीत आहेत.
------
फोटो ओळ
१) जिल्हा रुग्णालयाच्या आवारात पडून असलेला ऑक्सिजन टँक.
२) जिल्हा रुग्णालयात अशा प्रकारे ऑक्सिजन सिलिंडर बदलण्याची कसरत करावी लागते.
३) घाटीतील सुपर स्पेशालिटी ब्लाॅकमध्ये दाखल झालेला ऑक्सिजन टँक.