शहरालगतच्या वसाहती, नगरपालिका क्षेत्रात रुग्ण अधिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:06 AM2021-03-07T04:06:27+5:302021-03-07T04:06:27+5:30
औरंगाबाद : जिल्ह्यातील ग्रामीण भागात रुग्ण वाढत आहेत; मात्र दुर्गम भागातील गाव खेड्यांपेक्षा शहरालगतच्या वसाहती, नगर परिषदांचे क्षेत्रात सर्वाधिक ...
औरंगाबाद : जिल्ह्यातील ग्रामीण भागात रुग्ण वाढत आहेत; मात्र दुर्गम भागातील गाव खेड्यांपेक्षा शहरालगतच्या वसाहती, नगर परिषदांचे क्षेत्रात सर्वाधिक कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आहेत. संक्रमित न झालेल्या गावांत कोरोनाची बाधा थोपवणे आरोग्य विभागासह प्रशासनासमोरील आव्हान असणार असून, तपासणीचा पाॅझिटिव्हिटी रेट उंचावत असल्याने चिंता व्यक्त होत आहे.
गेल्या वर्षभरात कोरोनाच्या सावटातून बाहेर पडताना आता कुठे अर्थचक्र रुळावर आले. तर पुन्हा कोरोनाच्या विषाणूचे संक्रमण सुरू झाल्याने ग्रामीण भागातही रुग्ण वाढायला सुरुवात झाली. त्यामुळे लाॅकडाऊनच्या सुरू झालेल्या चर्चेमुळे ग्रामीण भागातून चिंता व्यक्त होत आहे. शनिवारी दिवसभर लाॅकडाऊन लागणार का, अशीच विचारणा समाजमाध्यमांसह गावखेड्यातून होताना दिसून आली. शुक्रवारी १०६ रुग्ण वाढल्याने चिंता व्यक्त होत असताना शनिवारी दिवसभरात ६७ रुग्ण आढळून आल्याने काहीसा दिलासा मिळाला. औरंगाबाद तालुक्यात सर्वाधिक सक्रिय रुग्णांचा आकडा वाढून १३९ झाला आहे. तर २८ रुग्ण औरंगाबाद तालुक्यात शनिवारी आढळून आले. फुलंब्री ६, गंगापूर ८, कन्नड ११, खुलताबाद ४, वैजापूर ५, पैठण २ रुग्ण आढळून आले.
मात्र, आज कोरोनामुक्त असलेल्या गावांत कोरोना पोहोचणार नाही. यासाठी आरोग्य विभागाकडून काळजी घेतली जात आहे, तसेच गावकऱ्यांनीही अधिक काळजी घेण्याची गरज असल्याचे मत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर शेळके यांनी व्यक्त केले. मास्क, सुरक्षित अंतर आणि वारंवार हात धुणे या त्रिसुत्रीसह कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
---
ग्रामीणमधील बाधित रुग्णांचा वाढता आलेख
दिनांक - बाधित रुग्ण - पाॅझिटिव्हिटी रेट
१ मार्च - २६ - १२.२३ टक्के
२ मार्च - ४२-१२.२१ टक्के
३ मार्च -६४ -१२.२३ टक्के
४ मार्च -४९ -१२.२३ टक्के
५ मार्च -१०६ -१२.२६ टक्के
६ मार्च -६७ -१२.२८ टक्के