रुग्ण देतात ना पैसे, मग टाका खिशात; नि:शुल्क सेवेची कल्पना न देता रुग्णांकडून पैशांची आकारणी
By संतोष हिरेमठ | Published: August 30, 2023 07:38 PM2023-08-30T19:38:06+5:302023-08-30T19:38:51+5:30
छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील प्रकार
छत्रपती संभाजीनगर : जिल्हा सामान्य रुग्णालयात १५ ऑगस्टपासून नि:शुल्क रुग्णसेवेला सुरुवात झाली. मात्र, अद्यापही याची अनेक रुग्णांना, नातेवाइकांना कल्पनाच नाही. त्यामुळे ओपीडीत नोंदणी शुल्कासाठी अनेकजण पैसे पुढे करतात. हे पैसे नाकारून नि:शुल्क रुग्णसेवेची माहिती देण्याऐवजी पैसे आकारण्याचा प्रकार जिल्हा रुग्णालयात सुरू आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत जिल्हा रुग्णालयासह उपजिल्हा, ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रांत मोफत उपचार सुरू केले आहेत. ईसीजी, एक्स-रे, सीटी स्कॅनसारख्या तपासण्याही मोफत होत आहेत. जिल्हा रुग्णालयात ओपीडीत तपासणी करण्यासाठी पूर्वी १० रुपये नोंदणी शुल्क होते. नोंदणी केल्यानंतरच रुग्णांना संबंधित डाॅक्टरांकडे जाऊन तपासणी करून घेता येते. नि:शुल्क तपासणीला सुरुवात झाल्यानंतरही पैसे घेण्यात येत असल्याच्या तक्रारी ‘लोकमत’ला प्राप्त झाल्या. यासंदर्भात ‘लोकमत’ने पडताळणी केली. तेव्हा काही जणांकडून पैसे आकारण्यात येत असल्याचे दिसून आले. पैसे देणाऱ्यांना नि:शुल्क रुग्णसेवेविषयी कल्पनाच नसल्याचेही दिसून आले.
खेळाडूकडूनही वसुली
विविध क्रीडा स्पर्धांसाठी जाणाऱ्या खेळाडूंकडून तपासणी शुल्क आकारण्यात येत असल्याचे दिसून आले. एकत्रित आलेल्या ६ खेळांडूकडून ६० रुपये आकारण्यात आले. रुग्णांना नि:शुल्क सेवा आहे. पण, खेळांडूबाबत स्पष्ट आदेशच नसल्याचे सांगितले जात आहे.
दर्शनी भागात फलक का नाही?
नि:शुल्क सेवेसंदर्भात दर्शनी भागात फलक लावण्याची सूचना करण्यात आलेली आहे. मात्र, जिल्हा रुग्णालयात अद्यापही हा फलक लावलेला नाही. शुल्क घेताना आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाईचेही आदेश आहेत.
ज्यांना माहिती ते पैसे देत नाही
नि:शुल्क रुग्णसेवेविषयी ज्यांना माहिती आहे, ते पैसे देत नाहीत. रांगेत उभे असताना अनेकजण हातात पैसे घेऊन असतात. चर्चेतून रुग्णालयात मोफत सुविधा असल्याची माहिती मिळते आणि रुग्ण हातातील पैसे स्वत:च्या खिशात टाकतात. अनेक रुग्णांनी रुग्णालयात मोफत उपचार मिळाल्याचेही सांगितले.