कमी कर्मचाऱ्यांवर रुग्णांची मदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:04 AM2021-04-25T04:04:51+5:302021-04-25T04:04:51+5:30
सोयगाव : जरंडी आणि निंबायती या दोन कोविड केंद्रांसाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने नियुक्त केलेल्या ११ आरोग्य कर्मचाऱ्यांवर सोयगाव ...
सोयगाव : जरंडी आणि निंबायती या दोन कोविड केंद्रांसाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने नियुक्त केलेल्या ११ आरोग्य कर्मचाऱ्यांवर सोयगाव तालुक्यातील कोविडच्या नियंत्रणाची जबाबदारी देण्यात आली आहे. या दोन्ही केंद्राची रुग्णसंख्या ७५ असून, त्यांच्यावरील उपचाराची मदार संबंधित कर्मचाऱ्यांवर आहे. तालुक्यातील रुग्ण जरंडी आणि निंबायतीच्या केंद्रांत उपचार घेत असल्याने येथे कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे.
तालुक्यात कोविड रुग्णांच्या तपासणीसाठी स्वतंत्र पथक आहे; मात्र त्यांना तपासण्यासह केंद्रातील रुग्णांवरसुद्धा उपचार करण्याची जबाबदारी आहे. सोयगाव, जरंडी आणि निंबायती या कोविड केंद्रांसाठी आरोग्य विभागात विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती; परंतु मान्यतेसाठी पाठविलेल्या याद्यांना जिल्हा स्तरावरून मान्यता मिळाली नसल्याने अडचणी येत आहेत. रखडलेल्या भरती प्रक्रियेला अद्यापही हिरवा कंदील मिळालेला नाही. निंबायती कोविड केंद्रासाठी अद्यापही वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्याने एका आरोग्य सेवकावर या केंद्राची उपचार पद्धती सुरू आहे. या कोविड केंद्रासाठी आठवड्यातून एकदा जरंडीच्या वैद्यकीय अधिकाऱ्याकडून तपासणी करून घेतली जाते. त्यामुळे निंबायती कोविड केंद्रातील रुग्णांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
----- कोट ----
जरंडी आणि निंबायती कोविड केंद्रासह आरोग्य विभागाच्या प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे अडचणी येतात; मात्र कोविड संसर्गाच्या कामाला प्राधान्य देऊन ही प्रक्रिया गतिमान करण्यात आली आहे. आरोग्य यंत्रणेवर ताण पडलेला असतानाही कर्मचारी कामात कुचराई करत नाही.
- डॉ. श्रीनिवास सोनवणे, तालुका आरोग्य अधिकारी सोयगाव.