‘पाटोदा पॅटर्न’ आता मध्यप्रदेशातही राबविणार

By Admin | Published: June 11, 2014 12:41 AM2014-06-11T00:41:40+5:302014-06-11T00:52:32+5:30

वाळूज महानगर : राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त पाटोदा गावाला आज मध्यप्रदेशच्या निर्मल भारत पथकाने भेट देऊन पाहणी केली.

Patoda Pattern will now be implemented in Madhya Pradesh | ‘पाटोदा पॅटर्न’ आता मध्यप्रदेशातही राबविणार

‘पाटोदा पॅटर्न’ आता मध्यप्रदेशातही राबविणार

googlenewsNext

वाळूज महानगर : राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त पाटोदा गावाला आज मध्यप्रदेशच्या निर्मल भारत पथकाने भेट देऊन पाहणी केली. पथकाने गावातील विकासकामे पाहून हा पाटोदा पॅटर्न मध्यप्रदेशात राबविण्याचा संकल्प केला.
स्वच्छता अभियानात पाटोदा गावाने राज्यात प्रथम येण्याचा बहुमान मिळविला असून, लोकसहभागातून गावात विविध विकासकामे करण्यात आली आहेत. नियमित कर भरणाऱ्यांना मोफत दळण, आगाऊ कर भरणाऱ्यांना संसारोपयोगी साहित्याचे वाटप, शालेय विद्यार्थ्यांना मोफत दूध, गरोदर मातांसाठी मदर केअर सेंटर, गावात शुद्ध पाणीपुरवठा, सौर ऊर्जेचे दिवे, आयएसओ ग्रामपंचायत व अंगणवाड्या, सांडपाणी व कचरा व्यवस्थापन आदी उपक्रम यशस्वीरीत्या राबवून अल्पावधीत गावाचा चेहरा बदलून गेला आहे. या गावाने राबविलेल्या मोफत दळणाची चर्चा राज्यभर पसरल्यामुळे या गावाचे अनुकरण प्रत्येक गावाने करण्याचे आवाहन ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांनी केले होते. राज्य शासनाचे जवळपास सर्वच पुरस्कार या गावाला मिळाले आहेत.
मध्यप्रदेशच्या ‘निर्मल भारत’ पथकात भोपाळ जिल्हा परिषदेचे उपायुक्त अशोक निम, मुख्य कार्यकारी अधिकारी एम.आर. मीना, गौतम महतो, मनेश जैन, शैलेश मुजुमदार आदींसह ४३ सदस्य होते.
पथकाने ग्रामस्थांशी संवादही साधला. पाटोदा खेडेगाव असूनही येथे शहराला लाजवेल अशा सुविधा मिळत असल्याचे पाहून पथक भारावले. पाटोदा पॅटर्न मध्यप्रदेशात राबविण्याचा मनोदय अशोक निम यांनी बोलून दाखविला. मध्यप्रदेशात निर्मल भारत अभियान यशस्वीरीत्या राबविण्यासाठी आदर्श पाटोदा गावचे माजी सरपंच भास्कर पा. पेरे यांना मध्यप्रदेशात आमंत्रित करण्यात आले आहे.
प्रारंभी, पथकातील सदस्यांचा सत्कार ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आला. यावेळी माजी सरपंच भास्कर पा. पेरे, ग्रामविकास अधिकारी आर.डी. चौधरी, स्वच्छता अभियानच्या जिल्हा समन्वयक वैशाली जगताप, तालुका समन्वयक ए.ए. पठाण, पी.पी. भुईगळ, सुनील मातकर, सखाहरी पेरे, आबासाहेब लोखंडे, सोमनाथ पेरे, अप्पासाहेब पेरे, भाऊसाहेब मरक, दिलीप भालेराव, दीपाली पेरे व ग्रामस्थ उपस्थित
होते.

Web Title: Patoda Pattern will now be implemented in Madhya Pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.