मत्स्य व्यावसायिकांसाठी विद्यापीठातील ‘डीएनए बारकोडिंग’ केंद्र ठरतेय वरदान
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2024 07:08 PM2024-08-23T19:08:13+5:302024-08-23T19:14:19+5:30
विद्यापीठ वर्धापन दिन विशेष: १३० पेक्षा अधिक राष्ट्रीय शोधनिबंध प्रकाशित, मत्स्य संघटनांना केले जाते मार्गदर्शन
- राम शिनगारे
छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील ‘पॉल हेबर्ट डीएनए बारकोडिंग’ आणि ‘जैवविविधता संशोधन केंद्र’ मत्स्य व्यावसायिकांसाठी वरदान ठरत आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ३६ पेक्षा अधिक मत्स्य व्यावसायिक संस्थांना केंद्रांतर्फे मार्गदर्शन केले जात असून, आंतरराष्ट्रीय पातळीवरील माशांच्या संदर्भातील मूलभूत संशोधनही या केंद्रातून अविरतपणे होत आहे. या केंद्रात जायकवाडी धरणातील मासेमारीच्या संदर्भात केलेल्या पहिल्या वैज्ञानिक संशोधनाची दखल उच्च न्यायालयाने घेतली असल्याची माहिती संचालक डॉ. गुलाब खेडकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
विद्यापीठाचा ६६वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. विद्यापीठात होत असलेल्या महत्त्वाच्या संशोधनात डीएनए बारकोडिंग संशोधन संस्थेचा मोठा वाटा आहे. २००४ साली एका पत्र्याच्या शेडमध्ये सुरू झालेले हे संशोधन केंद्र आज मोठ्या आलिशान इमारतीमध्ये पोहोचले आहे. या केंद्रात प्रामुख्याने माशांच्या प्रजातींवर संशोधन करण्यात येते. या संशोधनाची दखल आतापर्यंत केंद्र शासन, राज्य शासनासह आंतरराष्ट्रीय पातळीवरही घेण्यात आली आहे. माशांशिवाय देशातील जैवविविधता जोपासण्यासाठी हे केंद्र आघाडीवर आहे. या केंद्रात अनेक मौलिक प्रकारचे संशोधन केले आहे. वेगवेगळे प्रकल्प राबविण्यात आले आहेत. कोविडच्या जीवघेण्या काळात याच केंद्रात कोविडच्या टेस्ट करण्यात आल्या. रात्रंदिवस ३३ लोकांनी तब्बल ७ लाख ३५ हजारांहून अधिक कोविड टेस्ट करण्याचे अभूतपूर्व असे कार्य केले आहे.
केंद्रातील महत्त्वाचे संशोधन
- संशोधन केंद्र सुरू झाल्यानंतर २००४ मध्ये प्लास्टिक टाकून मत्स्य व्यवसाय करता येऊ शकतो. हा प्रयोग केला. त्यास यश मिळाले. तो देशातील पहिलाच प्रयोग होता. तत्कालीन कृषीमंत्री शरद पवार यांनी या प्रकल्पाला भेट देत कौतुक केले होते.
- नर्मदा, गोदावरी, कावेरी, महानदी, कृष्णा, दुधना अशा वेगवेगळ्या नद्यांतील माशांचे वेगळेपणाचा अभ्यास केला. त्यातून अनेक नवीन निष्कर्ष पुढे आले.
- उच्च न्यायालयाने पशू अभयारण्यामुळे जायकवाडी धरणातील मत्स्य व्यवसायावर बंदीचा निर्णय घेतला होता. त्यावर संशोधन केंद्राने पहिल्यांदा जायकवाडीचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून अभ्यास केला. त्या अभ्यासाचा आधार घेत काही संघटना पुन्हा न्यायालयात गेल्या. आता शासनानेही त्यावर एक समिती नेमली आहे.
- भारतात वेगवेगळ्या मार्गाने आलेले मासे देशातील जैवविविधतेसाठी धोकादायक ठरत असल्याचे संशोधनातून सिद्ध केले.
- माशांचा जनुकीय अभ्यास करण्यासाठीचा एक प्रस्ताव शासनाला सादर केला. त्यानुसार शासनाने धोरण ठरवून अनेक संशोधन प्रकल्प जाहीर केले.
- मत्स्यबीज निर्मितीसाठी पोर्टेबल बीज तयार करण्याविषयीचे संशाेधन केले. त्यानुसार बीज तयार करणाऱ्या यंत्राचा शोध लावला. त्याशिवाय मत्स्य व्यवसायावर मराठीतून चार ग्रंथही लिहिले आहेत.
केंद्रांची सांख्यिकी
-पेटंटची संख्या : २
-संशोधन प्रकल्प : १४
-पीएच.डी. संशोधक : १२
-संशोधन शिष्यवृत्ती : ४०
-आंतरराष्ट्रीय शोधनिबंध : १३०
-संशोधनात सहभागी संस्था : देशातील ६५ व परदेशातील १५ विद्यापीठे
-सहभागी संशोधक : ७०
देशातील नामांकित संशोधन केंद्रांत समावेश
विद्यापीठातील डीएनए बारकोडिंग केंद्राचा देशातील नामांकित संशोधन केंद्रांत समावेश होताेच. मात्र, जैवविविधतेच्या बाबतीत हे केंद्र आंतरराष्ट्रीय पातळीवरही आगामी काळात आपल्या संशोधनाचा ठसा उमटवेल.
-डॉ. गुलाब खेडकर, संचालक, डीएनए बारकोडिंग