चक्क महिनाभरात तडकले जिल्हाधिकारी कार्यालयातील पेव्हर ब्लॉक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 12:26 PM2018-02-27T12:26:54+5:302018-02-27T12:43:08+5:30
जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील उपविभागीय दंडाधिकार्यांच्या कार्यालय आवारात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून बसविण्यात आलेले पेव्हरब्लॉक महिनाभरात तडकले आहेत.
औरंगाबाद : जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील उपविभागीय दंडाधिकार्यांच्या कार्यालय आवारात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून बसविण्यात आलेले पेव्हरब्लॉक महिनाभरात तडकले आहेत. २ लाख रुपयांच्या कामात निकृष्टपणाचा कळस गाठला असून, फुटलेल्या ब्लॉकवर जिल्हा प्रशासनातील अधिकार्यांनी कर्मचार्यांकडून क्रमांक टाकून घेतले आहेत. ४०० हून अधिक ब्लॉक फुटल्यामुळे हे काम गुणवत्तापूर्ण झाले नसल्याचे स्पष्ट होत आहे.
या कामाप्रकरणी जिल्हा प्रशासनाकडून सार्वजनिक बांधकाम विभागाला एक पत्र देण्यात आले आहे. तातडीने दुरुस्ती करण्याच्या नावाखाली या कामाच्या खर्चाला मंजुरी घेण्यात आल्यानंतर बांधकाम विभागाने ते काम एका मजूर सहकारी संस्थेला दिले. महिनाभरापूर्वीच ते काम हाती घेण्यात आले. पूर्ण ब्लॉक बसविण्याचे काम झाल्यानंतर काही दिवसांतच ब्लॉकला तडे गेले. त्यामुळे हे काम निकृष्ट असल्याचे लक्षात येते, उपविभागीय अधिकार्यांच्या कार्यालयातील कर्मचार्यांनी फुटलेल्या ब्लॉकवर क्रमांक टाकून त्याची मोजणी केली. त्या कामाचे बिल अदा केले असून, ते ब्लॉक बदलणार की तसेच राहणार याबाबत उपअभियंता वाकळे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
वाळूच्या ट्रक्समुळे फुटले असतील
उपविभागीय कार्यालयाच्या आवरात बसविण्यात आलेले पेव्हर ब्लॉक हे फुटपाथवर बसविण्यासाठी वापरले जाणारे ब्लॉक आहेत. कंत्राटदार संस्थेने काम केले तेव्हा ब्लॉक चांगले होते. त्या ब्लॉकचे टेस्टिंग केले होते. त्यावरून वाळूचे ट्रक गेल्यामुळे ते फुटले का, हे पाहावे लागेल. कार्यालय आवारात नागरिकांची वर्दळ असल्यामुळे तेथे फुटपाथसाठी वापरण्यात येणारे ब्लॉक बसविले. वाळूच्या व इतर वाहनांच्या वजनामुळे ते फुटले असतील तर बदलून देण्याचा प्रयत्न करू. २ लाखांच्या आसपास त्यावर खर्च झाला असेल, असे अभियंता कदीर अहमद यांनी सांगितले.