वडगावातील पाईपलाईनचे कंत्राट रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 08:58 PM2019-02-28T20:58:44+5:302019-02-28T20:58:58+5:30
रखडलेल्या पाईपलाईनच्या मुख्य कामासह इतर प्रलंबित प्रश्नावर वडगाव कोल्हाटी-बजाजनगर ग्रामपंचायतीच्या मासिक बैठकीत गुरुवारी (दि.२८) चर्चा करण्यात आली.
वाळूज महानगर : रखडलेल्या पाईपलाईनच्या मुख्य कामासह इतर प्रलंबित प्रश्नावर वडगाव कोल्हाटी-बजाजनगर ग्रामपंचायतीच्या मासिक बैठकीत गुरुवारी (दि.२८) चर्चा करण्यात आली. या बैठकीत पाईपलाईनचे कंत्राट रद्द करुन नव्याने निविदा काढण्याचा निर्णय घेण्यात आला.
ग्रामपंचायत कार्यालयात गुरुवारी सकाळी ११ वाजता सरपंच उषा साळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. पाणी हा गावचा मुख्य प्रश्न असल्याने सुरुवातीलाच पाईपलाईनच्या कामाच्या विषयावर चर्चा करण्यात आली. संबंधित ठेकेदाराला पाईपलाईनच्या कामाचे दिलेले कंत्राट रद्द करावे. व या कामाचे नवीन अंदाजपत्रक तयार करुन फेर निविदा काढावी, असा ठराव पारित करण्यात आला. तसेच दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत दलित वस्तीतील विविध कामांचा प्रस्ताव शासनाकडे पाठविणे, सिडकोच्या परवानगी शिवाय कोणत्याही मालमत्तेच्या नोंदी घेवू नये, दिव्यांगांसाठीचा राखीव निधी खर्च करणे आदी प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. बैठकीला ग्रामविकास अधिकारी एम.बी. ढाकणे, ग्रा.पं. सदस्य अरुण वाहुळे, रमाकांत भांगे, मोहन गिरी, अलका शिंदे, सुरेखा लगड, संगीता कासार, श्रीकृष्ण भोळे, सचिन गरड, मंदा भोकरे, श्रीकांत साळे, उषा हांडे यांची उपस्थिती होती.
पाण्यासाठी नागरिकांना पुन्हा प्रतीक्षा
वर्षभरापूर्वी अंतर्गत पाईपलाईनचे काम खाजगी ठेकेदाराला दिले. ग्रामपंचायत व ठेकेदार यांच्यातील वादामुळे अजून काम सुरु झाले नाही. ग्रासभेपाठोपाठ पदाधिकाऱ्यांच्या मासिक बैठकीत सदरील कंत्राट रद्द करण्यात आले. गावातील पाणीप्रश्न सुटेल म्हणून नागरिकांनी वर्षभर त्रास सहन केला. आता पुन्हा नव्याने निविदा प्रक्रिया सुरु होणार असल्याने यात बराच वेळ जाणार आहे. त्यामुळे नागरिकांना शुद्ध पाण्यासाठी आणखी प्रतिक्षा करावी लागणार हे मात्र निश्चित आहे.