खतांच्या वाढीव किमतीबाबतच्या सतीश चव्हाण यांच्या पत्राची पवारांकडून दखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:05 AM2021-05-19T04:05:37+5:302021-05-19T04:05:37+5:30
औरंगाबाद : खतांच्या वाढलेल्या किमती कमी करण्यासंदर्भात केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून संकटात सापडलेल्या बळीराजाला दिलासा द्यावा,अशी मागणी आ. सतीश ...
औरंगाबाद : खतांच्या वाढलेल्या किमती कमी करण्यासंदर्भात केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून संकटात सापडलेल्या बळीराजाला दिलासा द्यावा,अशी मागणी आ. सतीश चव्हाण यांनी खा. शरद पवार व खा. सुप्रिया सुळे यांच्याकडे करताच तासाभरातच खा. पवार यांनी आ. चव्हाण यांच्या पत्राचा संदर्भ देत केंद्रीय रसायन व खते मंत्री डी. व्ही. सदानंद गौडा यांना पत्र पाठवून खतांची दरवाढ कमी करण्यासंदर्भात स्वत: लक्ष घालण्याची मागणी केली.
खतांच्या वाढलेल्या किमतीसंदर्भात मंगळवारी आ. चव्हाण यांनी मुंबईत खा. सुप्रिया सुळे यांची भेट घेऊन चर्चा केली. काही कारणास्तव खा. पवार यांची भेट न झाल्याने आ. चव्हाण यांनी शरद पवार यांच्यासाठी दिलेले पत्र खा. सुळे यांनी खा. पवार यांच्या निदर्शनास आणून देणार असल्याचे सांगितले.
सदानंद गौडा यांना पाठविलेल्या पत्राला खा. पवार यांनी आ. चव्हाण यांचे पत्रही जोडले आहे. कोरोनाच्या संकट काळात आधीच शेतकऱ्यांच्या मालास भाव मिळत नसल्याने बळीराजा मेटाकुटीला आला आहे. त्यात खतांच्या किमतीत भरमसाठ वाढ करून केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे. ११७५ रुपयांची १०.२६.२६ खताची पन्नास किलोची गोणी आता १७७५ रुपयांना मिळणार आहे. जो डीएपी ११८५ रुपयाला होता तो आता १९०० रुपयांना मिळणार आहे. अशाच प्रकारे इतर रासायनिक खतांचे दर सुद्धा वाढलेले असल्याचे आ. चव्हाण यांनी निदर्शनास आणून दिले. एकीकडे ग्रामीण भागात कोरोनाचा वाढता संसर्ग व ‘लॉकडाऊन’मुळे शेतकरी प्रचंड अडचणीत सापडला आहे. डिझेलच्या भाववाढीमुळे शेती मशागतीचे नियोजन कोलमडून पडले आहे. ट्रॅक्टरची मशागत महागली असून नांगरणी, पेरणी, रोटा, सरी पाडणे आदी कामे ट्रॅक्टरने केली जात असल्याने शेतकऱ्यांना खर्चाचा मेळ बसवणे अवघड झाले आहे. त्यात या खतांच्या भाववाढीमुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार असल्याचे आ. चव्हाण यांनी सांगितले.
...