१४०० रुपये द्या अन् दिव्यांग प्रमाणपत्र घ्या...! घाटी रुग्णालयात एजंटांचा उद्योग जोरात
By संतोष हिरेमठ | Published: July 29, 2022 07:57 PM2022-07-29T19:57:40+5:302022-07-29T19:58:44+5:30
ग्रामीण भागांतील रुग्ण, नातेवाईकांचा खिसा केला जातोय रिकामा
- संतोष हिरेमठ
औरंगाबाद : दिव्यांग प्रमाणपत्र पाहिजे, मग १४०० रुपये द्या आणि प्रमाणपत्र घ्या...असे सांगून एजंटांकडून घाटी रुग्णालयात येणाऱ्या गोरगरीब रुग्णांचा खिसा रिकामा करण्याचा उद्योग सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. घाटीतील लोकांना पैसे द्यावे लागतात, हा बहाणा सांगून पैसे उकळले जात आहे.
घाटी रुग्णालयातील मनोविकृती चिकित्साशास्त्र विभागात फुलंब्रीहून भावाचे दिव्यांग प्रमाणपत्र काढण्यासाठी एक व्यक्ती आली. दिव्यांग प्रमाणपत्र काढून देण्यासाठी त्याने एका एजंटाला १४०० रुपये दिले. हा एजंट त्यांच्यासोबत घाटीत फिरत होता परंतु ओपीडीतील पावती काढण्यापासून तर डाॅक्टरांना दाखवेपर्यंतची सर्व कामे हा व्यक्तीच करत होता. एजंट फक्त सोबत करत होता. यादरम्यान शासकीय शुल्काव्यतिरिक्त पैसे द्यावे लागले नाही. हे लक्षात येताच त्या व्यक्तीने एजंटाला धरून मनोविकृती चिकीत्साशास्त्र विभागप्रमुख डाॅ. प्रसाद देशपांडे, डाॅ. प्रदीप देशमुख, समाजसेवा अधीक्षक नरेंद्र भालेराव यांच्यापुढे उभे केले. तेव्हा एजंटाने पैसे परत देऊ, असे सांगितले. याविषयी संबंधित एजंटाविरोधात पोलिसांत तक्रार देण्याची सूचना डाॅक्टरांनी केली.
अवघे ७० रुपये शुल्क
घाटी रुग्णालयातील मनोविकृती विभागात दिव्यांग प्रमाणपत्र काढण्यासाठी २० रुपये ओपीडी शुल्क आणि ५० रुपये तपासणी शुल्क लागते. रुग्णालयात एक्सरे काढावा लागला तर त्याचे पैसे लागतात. त्याशिवाय कोणतीही रक्कम रुग्णालयात लागत नाही, असे डाॅक्टरांनी स्पष्ट केले. प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी घाटीबाहेर वेगवेगळे शुल्क आकारले जातात.
माझ्यासारखी इतरांची फसवणूक नको
भावाचे दिव्यांग प्रमाणपत्र काढून देतो म्हणून १४०० रुपये घेतले. ओपीडी शुल्क मीच भरले. रांगेत उभे राहण्यापासून तर झेराॅक्स आणण्यापर्यंतची कामे मीच केली. घाटीत अवघे ७० रुपयांचे शुल्क लागले. त्यामुळे १४०० रुपये घेऊन आपली फसवणूक झाली. २०० रुपये रोजंदारीने मी काम करतो. माझ्यासारखी इतरांची फसवणूक होऊ नये.
- फसवणूक झालेला रुग्णाचा भाऊ
केवळ शासकीय शुल्क, सतर्क राहावे
दिव्यांग प्रमाणपत्रासाठी शासकीय शुल्काव्यतिरिक्त कोणतीही रक्कम आकारली जात नाही. अशाप्रकारे कोणी जर प्रमाणपत्र काढून देण्यासाठी पैसे मागत असेल तर सतर्क झाले पाहिजे. कोणतीही रक्कम देऊ नये. संबंधित व्यक्तीला पोलिसांत तक्रार देण्याचे सांगण्यात आले आहे.
- डाॅ. प्रसाद देशपांडे, मनोविकृती चिकित्साशास्त्र विभागप्रमुख, घाटी