इकडे लक्ष द्या! पंतप्रधान आवास योजनेत मोफत नव्हे, १० ते १३ लाखांत घर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2022 05:42 PM2022-03-16T17:42:03+5:302022-03-16T17:45:02+5:30
घरे बांधण्यासाठी प्रकल्प सल्लागार समिती आणि कंत्राटदार म्हणून एकाच कंपनीची नेमणूक करण्यात येणार आहे.
औरंगाबाद : पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत मोफत घरे मिळणार म्हणून पाच वर्षांपूर्वी औरंगाबाद महापालिकेकडे तब्बल ८० हजार अर्ज आले. त्यातील पात्र अर्जांची संख्या जवळपास ५२ हजार आहे. तिसगाव, हर्सूल, पडेगाव येथील शासकीय जागांवर घरे बांधण्यासाठी कंत्राटदार नियुक्त करण्याची प्रक्रिया मनपाकडून राबविण्यात येत आहे. अर्ज केलेल्या लाभार्थ्यांना घर मोफत मिळणार नाही. ९ ते १३ लाख रुपये एका घरासाठी मोजावे लागतील. यामध्ये केंद्र आणि राज्य शासन अडीच लाख रुपये देईल.
महापालिकेने घरकूल योजनेचा डीपीआर तयार केला. त्यापूर्वी घरे बांधण्यासाठी प्रकल्प सल्लागार समिती आणि कंत्राटदार म्हणून एकाच कंपनीची नेमणूक करण्यात येणार आहे. निविदा प्रक्रियेत पंतप्रधान आवास योजनेचे काम केलेल्या तीन कंत्राटदारांनी निविदा दाखल केली. तिसगाव, हर्सूल, पडेगाव भागात एक घर बांधून देण्यासाठी किती रक्कम घेणार, हे कंत्राटदारांनी मनपाला लेखी स्वरूपात नमूद केले. साधारण १० ते १३ लाखांपर्यंत एक घर तयार करून देण्यास कंपन्या तयार आहेत. केंद्र आणि राज्य शासनाकडून मिळणारे अडीच लाख रुपये कंत्राटदाराला मिळतील, उर्वरित रक्कम कंत्राटदार लाभार्थ्याच्या नावावर बँकेकडून कर्ज घेईल. कर्जाची परतफेड नंतर लाभार्थ्याला करावी लागेल. विशेष बाब म्हणजे प्रत्येक लाभार्थ्याला फक्त ३२२ चौरस फुटांचे घर मिळेल.
अ-कंपनीचे दर
तिसगाव - १०,८०,०००
हर्सूल - ९,६०,०००
पडेगाव - १०,२०,०००
ब-कंपनीचे दर
तिसगाव - ११,४७,५००
हर्सूल - ११,३४,०००
पडेगाव - १२,१८,२४०
क-कंपनीचे दर
तिसगाव - १२,३०,०००
हर्सूल - १२,९०,०००
पडेगाव - १२,६०,०६०