इकडे लक्ष द्या, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सोमवारीच राहणार ईद-ए-मिलादची सुटी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2024 05:37 PM2024-09-14T17:37:11+5:302024-09-14T17:38:52+5:30
ईद ए मिलादच्या सार्वजनिक सुटीसाठी मुंबईपुरताच बदल करण्यात आला आहे
छत्रपती संभाजीनगर: राज्यात सोमवार दि.१६ रोजी जाहीर केलेली ईद-ए-मिलादची सार्वजनिक सुटी कायम ठेवावी अथवा रद्द करावी व त्याबदल्यात दि.१८ रोजी सुटी जाहीर करावी किंवा कसे याबाबत स्थानिक पातळीवर जिल्हाधिकारी यांनी निर्णय घ्यावा अशी अधिसुचना शासनाने जारी केली आहे. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज सकाळी पोलीस आयुक्त प्रविण पवार, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड तसेच सर्व उपविभागीय अधिकारी यांच्याकडून माहिती घेऊन जिल्ह्यात सोमवार दि.१६ रोजी असलेली सुटी कायम ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
अनंत चतुर्दशी आणि ईद-ए-मिलाद सण एकामागोमाग एक असल्याने दोन्ही समाजांमध्ये शांतता आणि सौहार्द रहावे यासाठी ईद ए मिलादची सार्वजनिक सुटी सोमवार, १६ सप्टेंबर, २०२४ ऐवजी बुधवार, १८ सप्टेंबर, २०२४ रोजी देण्यात आली आहे. हा बदल मुंबईपुरताच मर्यादित असला तरी उर्वरित महाराष्ट्रातील जिल्हाधिकाऱ्यांना स्थानिक परिस्थिती विचारत घेऊन सुट्टी बदलाचा निर्णय घ्यावा असे आदेश देण्यात आले आहेत. यानुसार जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी पोलीस आयुक्त प्रविण पवार, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड तसेच सर्व उपविभागीय अधिकारी यांच्याकडून माहिती घेऊन जिल्ह्यात सोमवारची सुटी कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जिल्ह्यात १४ सप्टेंबर दूसरा शनिवार, १५ सप्टेंबर रविवार आणि १६ सप्टेंबर ईद-ए-मिलाद अशा सलग सुट्या लागू असणार आहेत.