कर वसुलीकडे गांभीर्याने लक्ष द्या, अन्यथा कारवाईला सामोरे जा; औरंगाबाद मनपा आयुक्तांचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 01:10 PM2018-01-18T13:10:46+5:302018-01-18T13:13:27+5:30
महापालिकेची तिजोरी रिकामी झाल्याने मालमत्ता कर, पाणीपट्टीवर सर्वाधिक लक्ष देण्यात येत आहे. पन्नास कामे सोडून वसुलीकडे गांभीर्याने लक्ष द्या अन्यथा कारवाईला सामोरे जाण्याची वेळ येईल, असा इशारा मनपा आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी मंगळवारी सर्व वॉर्ड अधिकार्यांना दिला.
औरंगाबाद : महापालिकेची तिजोरी रिकामी झाल्याने मालमत्ता कर, पाणीपट्टीवर सर्वाधिक लक्ष देण्यात येत आहे. पन्नास कामे सोडून वसुलीकडे गांभीर्याने लक्ष द्या अन्यथा कारवाईला सामोरे जाण्याची वेळ येईल, असा इशारा मनपा आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी मंगळवारी सर्व वॉर्ड अधिकार्यांना दिला. मोठ्या थकबाकीदारांकडून सक्तीने वसुली करा, असे आदेश देण्यात आले.
मालमत्ता कराचे उद्दिष्ट २३० कोटी देण्यात आले आहे. मागील नऊ महिन्यांमध्ये फक्त ५४ कोटी रुपये वसूल झाले आहेत. ३१ मार्चपर्यंत चालू आर्थिक वर्षातील मालमत्ता कर वसूल करण्यासाठी सर्व वॉर्ड कार्यालयांना १४० कर्मचारी देण्यात आले आहेत. आता कर्मचारी नाहीत, अशी ओरड बंद झाली आहे. काहीही करा वसुली जास्तीत जास्त झालीच पाहिजे असा इशारा आयुक्तांनी मंगळवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रात एका बैठकीत दिला. वॉर्ड अधिकार्यांना जोमाने काम करण्याचा सल्ला आयुक्तांनी आपल्या पद्धतीने दिला. वसुली कमी झाल्यास अधिकारी व कर्मचार्यांचा पगार तीन महिने होणार नाही, असा इशारा देण्यात आला. वर्षअखेरीस सर्वात कमी वसुली असलेल्या अधिकार्याला कारवाईला सामोरे जावे लागणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.
पाणीपट्टीत ८० कोटींची तूट
समांतर जलवाहिनीचे काम करणार्या कंपनीने अवघ्या १४ महिन्यांमध्ये शहरातून तब्बल ९० कोटी रुपये पाणीपट्टी वसूल केली होती. मागील वर्षी महापालिकेने पाणीपट्टी फक्त ३६ कोटी वसूल केली. यंदा तर वसुलीने अधिकच तळ गाठला आहे. नऊ महिन्यांमध्ये फक्त ९ कोटी रुपये वसूल झाले आहेत. येणार्या अडीच महिन्यांमध्ये जास्तीत जास्त पाणीपट्टी वसूल करण्याचे मोठे आव्हान मनपाच्या वॉर्ड अधिकार्यांसमोर आहे.