हृदयाकडे लक्ष द्या, लक्षणांकडे दुर्लक्ष नको; नाहीतर डाॅक्टर म्हणतील ‘आय ॲम साॅरी’
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2022 07:34 PM2022-06-09T19:34:09+5:302022-06-09T19:34:14+5:30
‘गोल्डन अवर’ महत्त्वाचा, ६० टक्के रुग्ण रुग्णालयात पोहोचण्याआधीच दगावतात
- संतोष हिरेमठ
औरंगाबाद : छातीत दुखण्याचा त्रास, ॲसिडिटीमुळे त्रास होत असेल, जास्त दगदग झाली असेल, अशी अनेक कारणे पुढे करून रुग्ण दुर्लक्ष करतात. परिणामी, वेळेवर उपचार न मिळाल्याने ६० टक्के रुग्ण हे रुग्णालयात पोहोचण्याआधीच दगावतात आणि शेवटी ‘आय ॲम साॅरी...’ हे डाॅक्टरांचे शब्द नातेवाइकांना ऐकावे लागतात. त्यामुळे हृदयाच्या त्रासाकडे वेळीच लक्ष दिले पाहिजे, असा सल्ला हृदयरोगतज्ज्ञांनी दिला.
हृदयरोगतज्ज्ञ डाॅ. अजित भागवत म्हणाले, हृदयविकाराच्या झटक्याचे १० पैकी ६ रुग्ण हे रुग्णालयात येण्यापूर्वीच दगावतात. हृदयरोगतज्ज्ञ डाॅ. शिरीष देशमुख म्हणाले, ॲसिडिटीत कधीही घाम येत नाही. ॲसिडिटी ही सामान्य बाब आहे; पण छातीत जळजळ होऊन घाम येणे ही हृदयविकार असण्याची शक्यता असते. हृदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णाला ‘सीपीआर’ दिल्याचा फायदा होतो. हृदयरोगतज्ज्ञ डाॅ. श्रेयस रुणवाल म्हणाले, हृदयविकाराच्या कोणत्याही लक्षणांकडे दुर्लक्ष करता कामा नये.
‘गोल्डन अवर’ महत्त्वाचा
हार्ट अटॅकची लक्षणे जाणवल्यानंतर पहिला एक तास म्हणजे ‘गोल्डन अवर’ म्हटला जातो. यावेळेत योग्य उपचार मिळाले तर रुग्णाचा जीव धोक्याबाहेर येण्यास मदत होते. या पहिल्या तासात हृदयाच्या रक्तवाहिनीत निर्माण झालेला अडथळा मोकळा करण्यात आला, तर हृदयाला इजा होण्यापासून थांबविता येते.
हा रुग्ण वाचला, कारण...
छातीत दुखते म्हणून रुग्णालयात आलेला तरुण हृदयविकाराच्या झटक्याने अचानक कोसळल्याची घटना औरंगाबादेतील जिल्हा रुग्णालयात जानेवारीअखेरीस घडली. नाडीही बंद होती, पण २० मिनिटांत डाॅक्टर आणि परिचारिकांनी सीपीआर, तीन वेळा शाॅक ट्रीटमेंट देऊन जीव वाचवला. नंतर अँजिओप्लास्टी झाली. या तरुणाने नंतर डाॅक्टरांचा सत्कार करून कृतज्ञता व्यक्त केली. त्याला काही दिवसांपासून छातीत दुखण्याचा त्रास सुरू होता. काही होत नाही म्हणून दुखणे अंगावर काढत होता; मात्र मित्राच्या सल्ल्यामुळे तो रुग्णालयात आला व रुग्णालयातच कोसळला होता.
हार्ट अटॅकची लक्षणे...
- श्वास घेण्यास त्रास.
-खूप थकवा येणे.
- छातीत जळजळ होऊन घाम येणे.
- चक्कर येऊन उलटी होणे.
- एक हात दुखणे, पाठ दुखणे.
- जबडा दुखणे.
-हृदयाचे ठोके अनियमित किंवा खूप जास्त जोरात होणे
-अचानक खूप वजन कमी होणे.