रेशनकार्डधारकांनो एकडे लक्ष द्या, त्या-त्या महिन्यातच घ्या धान्य, नाही तर विसरा !
By विकास राऊत | Published: October 11, 2023 12:35 PM2023-10-11T12:35:48+5:302023-10-11T12:38:49+5:30
दरमहा रेशनदुकानांवरून धान्य घेतले नाहीतर पुढच्या महिन्यात पाठीमागील महिन्याचे धान्य मिळणार नाही.
छत्रपती संभाजीनगर : रेशनकार्डधारकांना आता दरमहा देण्यात येणारे धान्य त्याच महिन्यात घ्यावे लागणार आहे. दरमहा शिल्लक राहणारे धान्य आणि रेशन धान्यातील काळा बाजार रोखण्यासाठी शासनाने हे पाऊल उचलले आहे. दरमहा रेशनदुकानांवरून धान्य घेतले नाहीतर पुढच्या महिन्यात पाठीमागील महिन्याचे धान्य मिळणार नाही. या निर्णयाचे परिपत्रक शासनाने जारी केले आहे.
त्या- त्या महिन्यातच घ्यावे लागणार रेशन ......
स्वस्त धान्य दुकानातून देण्यात येणारे धान्य पूर्वी त्या महिन्यात घेतले नसल्यास पुढील महिन्याच्या सात दिवसांत घेण्याची मुभा होती. मात्र, आता ही मुभा बंद करण्यात आली आहे. त्याच महिन्यात धान्य घेण्याची सक्ती करण्याचा निर्णय शासनाच्या अन्न नागरी पुरवठा विभागाने घेतला आहे.
दुसऱ्या महिन्याच्या ७ तारखेपर्यंतची मुभा रद्द ....
चालू महिन्यांत धान्य घेतले नाहीतर पुढील महिन्याच्या १ तारखेपासून ७ तारखेपर्यंत असलेली मुभादेखील यापुढे नसेल. त्यामुळे नागरिकांना दरमहा नियमित वेळेत धान्य घ्यावे लागेल.
शिल्लक धान्याचा प्रश्नही निकाली....
कार्डधारकांनी धान्य न घेतल्यास ते दुकानदारांकडे शिल्लक असायचे. आता दरमहा धान्य कार्डधारकांना न्यावेच लागेल. त्यामुळे शिल्लक धान्याचा प्रश्न निकाली निघणार आहे.
जिल्ह्यात किती रेशनकार्डधारक.....
अंत्योदय योजना ६६ हजार १०५
प्राधान्य कुटुंब ७३ हजार १७८
शेतकरी ७२ हजार ६८८
एकूण ५ लाख ६३ हजार ४१७