दंड भरू, बाहेर विनामास्क फिरू; विनाकारण फिरणारे ८८ जण पॉझिटिव्ह !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:02 AM2021-05-22T04:02:17+5:302021-05-22T04:02:17+5:30
औरंगाबाद : संचारबंदीत मास्क न घालता फिरणाऱ्या नागरिकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. महापालिकेकडून मास्क न लावणाऱ्यांना प्रत्येकी पाचशे रुपये ...
औरंगाबाद : संचारबंदीत मास्क न घालता फिरणाऱ्या नागरिकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. महापालिकेकडून मास्क न लावणाऱ्यांना प्रत्येकी पाचशे रुपये दंड आकारण्यात येत आहे. दररोज ४० ते ५० हजार रुपये दंड औरंगाबादकर भरत आहेत. त्याचप्रमाणे कारण नसताना घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांची पोलीस आणि मनपाच्या आरोग्य विभागाकडून कोरोना तपासणी करण्यात येत आहे. मागील दीड महिन्यात ४ हजार ५५१ नागरिकांची तपासणी केली. त्यामध्ये तब्बल ८८ जण पॉझिटिव्ह आढळून आले.
कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन राज्य शासनाने मागील महिन्यात ब्रेक द चेनअंतर्गत निर्बंध लागू केले. दररोज सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी मुभा देण्यात आली. यानंतरही शहरातील प्रमुख रस्त्यांवर नेहमीप्रमाणेच वर्दळ दिसून येत आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने नागरी मित्र पथकाला पुन्हा एकदा शहरात ॲक्टिव्ह केले. मास्क न घालणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. दररोज ५० ते ६० हजार रुपये दंड वसूल करण्यात येत आहे. या दंडात्मक कारवाईनंतरही सुधारणा झालेली नाही. मास्कच्या बाबतीत अजूनही नागरिक गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. महापालिका आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने दिसेल त्याची कोरोना तपासणी सुरू केली. मागील दीड महिन्यात ४ हजार ५५१ नागरिकांची तपासणी केली. त्यामध्ये तब्बल ८८ जण बाधित आढळून आले.
१,३९,१४३
जिल्ह्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण
१,२९,८७८
जिल्ह्यातील एकूण कोरोनामुक्त रुग्ण
४,५५१
नागरिकांची दीड महिन्यात विनाकारण फिरताना पकडून कोरोना तपासणी.
८८
नागरिक या तपासणीत पॉझिटिव्ह आढळून आले
कारणे नेहमीचीच, किराणा, मेडिकलसाठी बाहेर पडलो...
पोलीस नागरिकांना घराबाहेर पडण्याचे कारण विचारत आहेत. प्रत्येक नागरिक मेडिकल घेण्यासाठी आलो होतो, दूध, भाजीपाला, किराणा सामानासाठी... अशी वेगवेगळी कारणे सांगताे. वेगवेगळ्या शासकीय कार्यालयांमध्ये काम होते. आताच घरातून निघालो. परत निघणार नाही. लहान मुलांचीही कारणे काही पालक सांगतात.
दहा ठिकाणी तपासणी केंद्रे
संचारबंदी लागू करण्यात आल्यानंतर महापालिका आरोग्य विभागाने दहा पथके तयार केली. पोलिसांच्या मदतीला ही पथके देण्यात आली. दररोज सकाळी दहा ते पाच, सायंकाळी पाच ते रात्री अकरा वाजेपर्यंत शहराच्या वेगवेगळ्या भागात दहा ठिकाणी तपासणी करण्यात येते. दररोज तीनशे ते चारशे नागरिकांची तपासणी सध्या होत आहे.