पैसे द्या, छावणी घ्या !

By Admin | Published: August 26, 2015 12:32 AM2015-08-26T00:32:02+5:302015-08-26T00:48:43+5:30

व्यंकटेश वैष्णव, बीड एकीकडे जनावराचा चारा संपला म्हणून शेतकरी आत्महत्या करीत आहेत तर दुसरीकडे पैसे घेऊन चारा छावणीचा प्रस्ताव दाखल करून घेणारी महसूल

Pay the money, take the camp! | पैसे द्या, छावणी घ्या !

पैसे द्या, छावणी घ्या !

googlenewsNext


व्यंकटेश वैष्णव, बीड
एकीकडे जनावराचा चारा संपला म्हणून शेतकरी आत्महत्या करीत आहेत तर दुसरीकडे पैसे घेऊन चारा छावणीचा प्रस्ताव दाखल करून घेणारी महसूल मधील दलालांची साखळी जिल्ह्यातील तहसील कार्यालयात सक्रिय झाल्याने छावणी चालविण्यास सक्षम असलेल्यांना संधी मिळेल की नाही, याबाबत साशंकता आहे. यामुळे छावण्या जितराबांना जगवतील का? हा प्रश्न निर्माण होत आहे. याचा प्रत्यय मंगळवारी जिल्ह्यात आला. बीडच्या तहसीलदारांनी तर मंगळवारी छावणीचा एकही प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविला नसल्याचे सूत्रांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.
जिल्ह्यातील दुष्काळाची भीषणता लक्षात घेऊन छावण्या तात्काळ सुरू करण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत. शिवाय जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी संबंधीत तहसीलदारांना सुटीच्या दिवशी देखील काम करून चारा परिस्थितीचा आढावा घेवून चारा छावण्यांचे प्रस्ताव तात्काळ जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दाखल करावेत असे, चारा टंचाई असलेल्या तालुक्यातील तहसीलदारांना आदेश दिले होते. मात्र, वडवणी वगळता इतर तालुक्यांमध्ये चारा छावणीचे प्रस्ताव पैसे घेऊन दाखल करून घेणारी महसूलची साखळी सक्रीय झाल्याचा प्रत्यय मंगळवारी छावणी सुरू करण्यास इच्छूक असलेल्यांना आला.
बीड तहसील कार्यालयात गर्दी
जिल्हा प्रशासनाने छावणीचे प्रस्ताव मागितले असल्याने मंगळवारी बीड तहसील कार्यालयात छावणीचे प्रस्ताव दाखल करण्यासाठी इच्छुकांनी गर्दी केली होती. छावणीचा प्रस्ताव टाकतानाच तहसील कार्यालयाकडून पैसे मागितले जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. यापूर्वी दुष्काळाच्या दरम्यान छावणी प्रस्ताव दाखल करण्यासाठी कधीच पैसे मागितल्याचा प्रकार घडला नसल्याचे देखील प्रस्ताव देण्यासाठी आलेल्यांनी सांगितले.
जाणीवपूर्वक विलंब
ज्यांचे प्रस्ताव आलेले आहेत त्यापैकी काहीच प्रस्तावांवर स्वाक्षरी करून तात्काळ जिल्हाधिकारी कार्यालयाकडै पाठविण्याची लगबग काही तहसीलदार करत आहेत.
जिल्ह्यातील चारा टंचाईने शेवटचे टोक गाठले आहे. यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ प्रस्ताव मागविले असताना देखील बीड तहसीलदार अमोल कदम यांना दुष्काळाचे कसलेच घेणे-देणे नसल्याचे चित्र पहावयास मिळाले. मंगळवारी दिवसभरात बीड तहसील कार्यालयाकडून एकही प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे गेला नसल्याने दिवसेंदिवस छावणी सुरू करण्यासाठी विलंब होत आहे.

Web Title: Pay the money, take the camp!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.