३१ मार्चपर्यंत मालमत्ता कर भरा; अन्यथा नंतर २४ टक्के व्याज
By मुजीब देवणीकर | Published: March 27, 2024 06:56 PM2024-03-27T18:56:31+5:302024-03-27T18:56:46+5:30
व्याजमाफीची योजना दोन वर्षांपासून बंद, चक्रवाढव्याज पद्धत
छत्रपती संभाजीनगर : मालमत्ता कर व पाणीपट्टीची रक्कम भरण्यासाठी दि. ३१ मार्चपर्यंत मुदत आहे. दि. १ एप्रिलपासून थकबाकीवर २४ टक्के चक्रवाढ पद्धतीने व्याजाची आकारणी मनपाकडून केली जाते. यापूर्वी व्याजावर ७५ टक्के सूट दिली जात होती. मागील दोन वर्षांपासून ही योजना सुद्धा बंद करण्यात आल्याने मालमत्ता कराचा बोजा नागरिकांवर वाढतच चालला आहे.
मालमत्ता करातून १३२ कोटी ४६ लाख, तर पाणीपट्टीच्या माध्यमाने २२ कोटी ४७ लाख रुपये, असे एकूण १५४ कोटी ९३ लाख रुपये वसूल झाले. गतवर्षीच्या तुलनेत वसुली वाढली आहे. शिवाय मालमत्ताधारक स्वत:हून कर लावून घेण्यासाठी पुढे येताहेत. १ एप्रिलनंतर नवीन मालमत्तांना दुप्पट वाढीव दराने कर लावण्यात येईल. एप्रिल ते जून या तीन महिन्यांत कर भरला तर उलट सामान्य करात सूट मिळते. ऑनलाइन पद्धतीने कर भरला तरी सूट मिळते. जुुलै महिन्यापासून दरमहा व्याज आकारणी सुरू होते. वर्षाअखेर हा आकडा २४ टक्के होतो.
झोननिहाय वसुलीचा आलेख
झोन --------- मालमत्ता कर-------- पाणीपट्टी---------------- एकूण (कोटी)
एक --------- १२.४९---- ---------- १.४६--------------- १३.९५
दोन ---------- ११.९३-------------- १.६८-------------- १३.६१
तीन---------- ०४.८६-------------- १.१९--------------- ०६.०५
चार----------- १२.४१------------ ३.७०----------------- १६.११
पाच----------- १८.५६------------ ३.१४------------------ २१.७०
सहा----------- ०९.७८------------ २.३३------------------ १२.११
सात----------- २१.७८------------ ३.९३------------------ २५.७१
आठ---------- २४.७२------------- ०.७४------------------- २४.९६
नऊ---------- १६.३८-------------- ४.३०------------------- २०.६८
दहा --------- ००.०५-------------- ००.०० ------------------ ००.०५
एकूण---------१३२.४६----------- २२.४७ ----------------- १५४.९३
१५४ कोटी वसूल
मालमत्ता कर, पाणीपट्टीच्या माध्यमातून १५४ कोटी रुपयांची वसुली झाली. ३५० कोटींचे उद्दिष्ट मनपाने डोळ्यासमोर ठेवले होते. त्या तुलनेत ५० टक्के वसुली झाली. ३१ मार्चपर्यंत हा आकडा आणखी बराच वाढण्याची शक्यता आहे.
कोणावर कारवाई?
मोठी थकबाकी असेल तर जप्ती
दहा लाखांपेक्षा जास्त रक्कम थकीत असलेल्या मालमत्ताधारकांना नियमानुसार तीन नोटिसा देण्याची प्रक्रिया मनपाने सुरू केली. नंतर मालमत्ता जप्त केली जाईल. तिचा लिलाव करून मनपा आपली मूळ रक्कम काढून घेईल.
मोठी पाणीपट्टी थकीत असेल तरी कारवाई
ज्या नागरिकांकडे, व्यावसायिकांकडे बरीच पाणीपट्टी थकीत असेल तर त्यांचेही नळ कापण्याची कारवाई महापालिका करणार आहे. ३१ मार्चपूर्वी पैसे भरण्याची संधी आहे.
वेळेत कर भरणा करावा
३१ मार्चपूर्वी थकबाकी, चालू आर्थिक वर्षाचा कर मालमत्ताधारकांनी भरावा. व्याजही टाळता येईल. जप्तीची कारवाईही टळेल.
- अपर्णा थेटे, उपायुक्त, मनपा