६३५ रुपयांच्या जागी १,६०० रुपये द्या; रेल्वे तिकीट लगेच ‘ओके’, एजंटांकडून मनमानी वसुली

By संतोष हिरेमठ | Published: October 26, 2024 02:56 PM2024-10-26T14:56:06+5:302024-10-26T14:56:37+5:30

दिवाळी प्रवासासाठी प्रवाशांचा खिसा रिकामा : एजंटांकडून मनमानी वसुली, कोण देणार लक्ष?

Pay Rs 1,600 instead of Rs 635; Railway ticket immediately 'OK', arbitrary charges by agents | ६३५ रुपयांच्या जागी १,६०० रुपये द्या; रेल्वे तिकीट लगेच ‘ओके’, एजंटांकडून मनमानी वसुली

६३५ रुपयांच्या जागी १,६०० रुपये द्या; रेल्वे तिकीट लगेच ‘ओके’, एजंटांकडून मनमानी वसुली

छत्रपती संभाजीनगर : दिवाळीसाठी रेल्वेने गावी जाणाऱ्या प्रवाशांना आरक्षण मिळविण्यासाठी जादा रक्कम मोजावी लागत आहे. बहुतांश रेल्वेचे आगामी काही दिवसांतील आरक्षण ‘वेटिंग’वर गेले आहे. मात्र, एजंटांना जास्त पैसे मोजताच अगदी सहजपणे रेल्वेचे आरक्षण मिळत असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या रिॲलिटी चेकमधून समोर आले.

दिवाळी सणासाठी गावी जाण्याची प्रवाशांची लगबग सुरू आहे. अनेकांनी नियोजन करून आधीच तिकीट बुक केले. तर काही जण ऐनवेळी प्रवासाचे नियोजन करीत आहे. प्रवासासाठी रेल्वेचे तिकीट मिळविताना प्रवाशांना काहीसा खिसा रिकामा करावा लागत आहे. एजंटांकडून मनमानी पद्धतीने पैसे आकारले जात असल्याची ओरड प्रवाशांमधून होत आहे. यासंदर्भात ‘लोकमत’ने रिॲलिटी चेक केले.

एजंट आणि लोकमत प्रतिनिधीमधील संवाद
प्रतिनिधी : २८ ऑक्टोबर रोजीचे मुंबईसाठी नंदीग्राम एक्स्प्रेसचे तिकीट पाहिजे.
एजंट : एसी हवे की नाॅन एसी?
प्रतिनिधी : नाॅन एसी.
एजंट : ७०० रुपये लागतील. एसीसाठी १,६०० रुपये लागतील.
प्रतिनिधी : एसी म्हणजे?
एजंट : थर्ड एसीसाठी १६०० रुपये आणि सेंकड एसीसाठी २ हजार रुपये लागतील.

रेल्वे तिकिटाचे भाडे किती?
रेल्वेच्या ऑनलाइन तिकीट बुकिंग प्रणालीत २८ ऑक्टोबर रोजी छत्रपती संभाजीनगर ते मुंबई प्रवासासाठी नंदीग्राम एक्स्प्रेसचे स्लीपरसाठी २३५ रुपये, थर्ड एसीसाठी ६३५ रुपये आणि सेंकड एसीसाठी ९०० रुपये दाखविण्यात आले. परंतु एजंटांकडून यापेक्षा दुपटीने पैसे आकारण्यात येत असल्याचे रिॲलिटी चेकमधून समोर आले.

तुम्हीही वापरू शकता ही आयडिया
छत्रपती संभाजीनगर ते दादर रेल्वे तिकीट वेटिंग असेल तर हिमायतनगर ते दादर तिकीट बुक करून बोर्डिंग छत्रपती संभाजीनगर करून रेल्वे प्रवास करता येऊ शकतो. त्यातून काहीसा तिकीट दर वाढू शकतो. मात्र, एजंटांच्या तुलनेत तो कमी असतो. काही ऑनलाइन बुकिंग प्रणाली असा पर्यायदेखील सुचवितात. मात्र, अशी बुकिंग करताना अधिकृत संकेतस्थळ, ॲपचा वापर करणे महत्त्वाचे ठरते.

Web Title: Pay Rs 1,600 instead of Rs 635; Railway ticket immediately 'OK', arbitrary charges by agents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.