३४० रुपये जास्त द्या अन् थेट रेल्वेत बसा ! तत्काळ तिकिटांचा काळाबाजार उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2021 12:30 PM2021-11-01T12:30:47+5:302021-11-01T12:34:27+5:30

 प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत अवाच्या सवा रकमेची आकारणी करण्यात येत असून याप्रकाराकडे रेल्वे यंत्रणेचे दुर्लक्ष होत आहे

Pay Rs. 340 more and board the train! Black market of instant tickets exposed | ३४० रुपये जास्त द्या अन् थेट रेल्वेत बसा ! तत्काळ तिकिटांचा काळाबाजार उघड

३४० रुपये जास्त द्या अन् थेट रेल्वेत बसा ! तत्काळ तिकिटांचा काळाबाजार उघड

googlenewsNext

- संतोष हिरेमठ
औरंगाबाद : दिवाळी सणामुळे प्रवाशांची गर्दी वाढल्याने रेल्वे गाड्या फुल्ल झाल्या आहेत. बहुतांश रेल्वेंचे आरक्षण वेटिंगवर गेले आहे. मात्र, तत्काळ तिकिटासाठी दरापेक्षा ३४० रुपये जास्त मोजले की थेट रेल्वेत बसता येत असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमधून समोर आले.

नोकरी, व्यवसायानिमित्त औरंगाबादेत आलेल्या नागरिकांची मोठी संख्या आहे. प्रकाशोत्सवासाठी सध्या सर्वांची गावी जाण्याची लगबग सुरू आहे. सुरक्षित आणि किफायतशीर प्रवास म्हणून अनेकांनी अनेक दिवस आधीच रेल्वेचे तिकीट बुक केले आहे. यातील काहींकडे वेटिंगचे तिकीट आहे. प्रवासाचा दिवस जवळ येऊनही तिकीट कन्फर्म होत नसल्याने उभे राहूनच प्रवास करावा लागणार असल्याची चिंता सतावत आहे. अशा परिस्थितीत तत्काळ तिकिटासाठी धाव घेतली जाते. परंतु तेही सहजासहजी मिळत नसल्याने अनेक जण एजंट गाठत आहेत. हे एजंट प्रवाशांकडून अवाच्या सवा रक्कम उकळत असल्याचे समोर आले आहे.

४१० चे तिकीट ७५० रुपयांना
रेल्वेस्टेशन परिसरातील एका एजंटाकडे नंदीग्राम एक्स्प्रसने १ अथवा २ नोव्हेंबर रोजी आदिलाबाद येथे जाण्यासाठी रेल्वे तिकिटाची मागणी केली. २ तारखेचे स्लीपरचे ९७ वेटिंग आहे. स्लीपरच्या तत्काळ तिकिटासाठी ४१० रुपये रेल्वेचा दर आहे, परंतु एजंटाने त्यासाठी ७५० रुपये मागितले. त्यासाठी फक्त नाव लिहा आणि एक दिवसा आधी तिकीट घेऊन जा, असे एजंटाने सांगितले. स्लीपरच्या वेटिंग तिकिटासाठी ३१० रुपये असताना त्यासाठीही ५०० रुपये सांगण्यात आले. ही सगळी बाब व्हिडिओत कैद झाली आहे.

तत्काळ तिकिटासाठी एजंटांची घुसखोरी
रेल्वे रवाना होण्याच्या एक दिवस आधी आरक्षण कार्यालयात तत्काळ तिकीट दिले जाते. रोज सकाळी ११ वाजता हे तिकीट दिले जाते. त्यासाठी सर्वसामान्य नागरिक जाऊ शकतो, परंतु यात अगदी सकाळपासूनच एजंट आणि त्यांची माणसे रांगेत उभी राहतात. त्यामुळे सर्वसामान्यांना तिकीट मिळत नाही. किमान दिवाळीत तरी प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणी प्रवाशांतून होत आहे. तत्काळ तिकीट ऑनलाईनदेखील काढता येते, असे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

एजंटसोबत झालेला संवाद
- प्रतिनिधी : आदिलाबादला जायचे आहे, रेल्वेचे तिकीट हवे.
- एजंट : कधी जायचंय ?
-प्रतिनिधी : १ नोव्हेंबरला
- एजंट : नंदिग्रामचे वेटिंग तिकीट मिळेल, सीटिंगसाठी ३०० आणि स्लीपरसाठी ५०० रुपये लागतील.
- प्रतिनिधी : वेटिंग तिकिटावर जाता येईल का?
- एजंट : जाता येईल, पण जागा मिळणार नाही, टीसीला पैसे दिले तर होऊ शकेल.
- प्रतिनिधी : कन्फर्म तिकीट द्या ना.
- एजंट : सकाळी ११ वाजता आले असते तर मिळाले असते.
- प्रतिनिधी : मग २ नोव्हेंबरचे द्या.
- एजंट : तत्काळ तिकीट मिळेल, स्लीपरसाठी ७५० रुपये लागतील. सीटिंग नाही.
- प्रतिनिधी : कन्फर्म राहील ना?
- एजंट : हो.
- प्रतिनिधी : त्यासाठी काय करावे लागेल?
-एजंट : आता नाव लिहून जा आणि उद्या दुपारी १२ वाजता येऊन तिकीट घेऊन जा.

Web Title: Pay Rs. 340 more and board the train! Black market of instant tickets exposed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.