८०० रुपये द्या, अवघ्या ५ मिनिटात लर्निंग लायसन्स घ्या !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2021 04:42 PM2021-10-09T16:42:40+5:302021-10-09T16:46:32+5:30

Lokmat Sting Operation : आरटीओ कार्यालयाबाहेरील रस्त्यावर चारचाकी वाहनांतून एकप्रकारे फिरती आरटीओ कार्यालयेच चालविली जात आहेत.

Pay Rs 800, get a learning license in just 5 minutes! | ८०० रुपये द्या, अवघ्या ५ मिनिटात लर्निंग लायसन्स घ्या !

८०० रुपये द्या, अवघ्या ५ मिनिटात लर्निंग लायसन्स घ्या !

googlenewsNext
ठळक मुद्दे७०० रुपये द्या आणि पर्मनंट लायसन्सच्या चाचणीत उत्तीर्ण होण्याची हमी

- संतोष हिरेमठ
औरंगाबाद : आरटीओ कार्यालयाबाहेरील ( RTO Office Aurangabad ) रस्त्यावरील चारचाकी वाहनात बसून ८०० रुपयांत अवघ्या ५ मिनिटांत लर्निंग लायसन्स (  get a learning license in just 5 minutes) मिळत असल्याचा धक्कादायक प्रकार ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमधून समोर आला. एवढेच नव्हे तर ७०० रुपये मोजले तर आरटीओ कार्यालयात पर्मनंट लायसन्ससाठी होणाऱ्या चाचणीत पास करून देण्याचा उद्योगही सुरू असल्याचा प्रकारही यातून उघड झाला आहे.

देशातील प्रादेशिक वाहतूक कार्यालये (आरटीओ) येत्या काही महिन्यांत बंद होणार असल्याचे संकेत केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी काही दिवसांपूर्वीच दिले आहे. पण आजघडीला आरटीओ कार्यालयाबाहेरील रस्त्यावर चारचाकी वाहनांतून एकप्रकारे फिरती आरटीओ कार्यालयेच चालविली जात आहेत. औरंगाबादेत १४ जूनपासून आरटीओत न येता ऑनलाइन चाचणी आणि लर्निंग लायसन्स देण्यास सुरुवात झाली. पण यात शिकाऊ वाहनचालकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे आरटीओ कार्यालयात जाऊन लर्निंग लायसन्स काढण्याचे प्रमाण आजही अधिक आहे. याचाच फायदा घेऊन कार्यालयाबाहेर लायसन्सचा उद्योग तेजीत आला आहे.

‘लोकमत’ने एका चारचाकी वाहनातील एजंटशी संवाद साधत लर्निंग आणि पर्मनंट लायसन्सची विचारणा केली. तेव्हा अनेक धक्कादायक माहिती समोर आली. दुचाकीच्या लर्निंग लायसन्ससाठी ३५० आणि पर्मनंट लायसन्ससाठी ७५० रुपये शासकीय शुल्क आहे. पण या शुल्कापेक्षा अधिक रक्कम उकाळत लायसन्स मिळवून देण्याची हमी एजंटाकडून देण्यात आली. हा सगळा प्रकार व्हिडिओत कैद झाला आहे.

कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा सहभाग?
पर्मनंट लायसन्सची चाचणी ही करोडी येथील आरटीओ कार्यालयाच्या जागेत होते. ही चाचणी मोटार वाहन निरीक्षक घेतात. स्टिंग ऑपरेशनमध्ये संबंधित एजंटाने पर्मनंट लायसन्सच्या चाचणीत उत्तीर्ण होण्यासाठी शुल्काव्यतिरिक्त ७०० रुपये लागेल, असे सांगितले. त्यामुळे लायसन्स वितरणाच्या उद्योगात कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या सहभागाशिवाय हे शक्य नाही, हे स्पष्ट होत आहे.

कारवाई केली जाईल
नागरिकांना घरच्या घरी लर्निंग लायसन्स काढता येते. त्यांना त्यासाठी कोणाकडे जाण्याची गरज नाही. सध्या नियमित कामकाजात अपुऱ्या मनुष्यबळाचा प्रश्न भेडसावत आहे. पण तरीही कोणी चुकीच्या पद्धतीने लायसन्स देत असेल तर कारवाई केली जाईल.
- संजय मेत्रेवार, प्रादेशिक परिवहन अधिकारी


प्रतिनिधी आणि एजंटामध्ये असा झाला संवाद

प्रतिनिधी : लर्निंग लायसन्ससाठी अर्ज भरायचा आहे.
एजंट : ३०० रुपये लागतील. पेपर आरटीओत तुम्हाला जमा करावे लागतील.

प्रतिनिधी : आरटीओ कार्यालयाऐवजी बाहेरही परीक्षा देता येते?
एजंट : तुम्हाला देता येईल का परीक्षा, आधार आहे का?

प्रतिनिधी : आधार कार्ड आहे.
एजंट : त्यासाठीही ३०० रुपयेच लागेल. परीक्षा तुम्हालाच द्यावी लागेल. नापास झाले तर नंतर कार्यालयात परीक्षा द्यावी लागेल. तेव्हा दीडशे रुपये लागेल.

प्रतिनिधी : कार्यालयाबाहेर परीक्षा देताना लायसन्स कन्फर्म होईल का?
एजंट : परीक्षा तुम्हालाच देणे आहे.

प्रतिनिधी: देईल, पण उत्तरांची माहिती हवी ना, त्यामुळे शंका वाटते.
एजंट : उत्तरं माहिती नसतील तर दुचाकीच्या लर्निंग लायसन्ससाठी ८०० रुपये लागतील. ३०० रुपये शुल्क आणि ५०० रुपये पास करण्यासाठी लागतील.

प्रतिनिधी : पर्मनंट लायसन्सचे कसे मग?
एजंट : लर्निंग मिळाल्यानंतर एक महिन्यांनी काढता येईल. त्यासाठी ९०० रुपये शुल्क लागेल. पर्मनंट लायसन्सच्या चाचणीत पास व्हायचे असेल तर ७०० रुपये वेगळे लागतील.

प्रतिनिधी : लर्निंग लायसन्स कधी मिळते.
एजंट : अवघ्या ५ मिनिटांत लर्निंग लायसन्स देऊ.

Web Title: Pay Rs 800, get a learning license in just 5 minutes!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.