वैद्यकीय बिलांच्या मंजुरीसाठी कॅन्सरग्रस्ताकडून लाच घेताना वेतन अधीक्षक अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2023 07:55 PM2023-03-09T19:55:23+5:302023-03-09T19:55:52+5:30
एसीबीची कारवाई : शिक्षकाकडून कार्यालयातच ५० हजार रुपये घेताना रंगेहाथ पकडले
छत्रपती संभाजीनगर : कॅन्सर झालेल्या शिक्षकाच्या पत्नीसह वडिलांच्या वैद्यकीय प्रतिपूर्तीच्या बिलातील तब्बल २० टक्के रक्कम लाच म्हणून घेताना जि. प.च्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या वेतन अधीक्षकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने कार्यालयातच बुधवारी रंगेहाथ पकडले. दिलीप परशराम जऊळकर (५०) असे लाच घेणाऱ्या वर्ग दोनच्या वेतन अधीक्षकाचे नाव असल्याची माहिती उपअधीक्षक मारुती पंडित यांनी दिली.
जि.प.च्या एका प्राथमिक शिक्षकाच्या पत्नीला कॅन्सर झालेला आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या उपचाराची ११, शिक्षकाच्या वडिलांच्या उपचाराची ३ मेडिकल बिले प्रतिपूर्तीसाठी शिक्षण विभागाकडे सादर केली होती. १४ बिलांची एकूण रक्कम ६ लाख ६३ हजार रुपये एवढी होती. मंजुरीसाठी शिक्षकाने कार्यालयाचे उंबरठे झिजवले. मात्र प्रतिसाद मिळला नाही. प्रत्येक टप्प्यावर पैशाची मागणी झाली. शेवटी ही बिले वेतन अधीक्षक जऊळकर यांच्या कार्यालयात पोहोचली. तेव्हा त्याने एकूण बिलाच्या रकमेच्या २० टक्के पैसे दिल्याशिवाय बिल ट्रेझरीत मंजुरीसाठी पाठवणार नसल्याचे सांगितले.
त्यामुळे शिक्षकाने २० टक्क्यांनुसार सुरुवातीला ५० हजार रुपये देण्याचे मान्य केले. मात्र, पैसे देण्याची इच्छा नसल्यामुळे त्यांनी ६ मार्चला एसीबीकडे तक्रार नोंदवली. एसीबीचे पोलिस निरीक्षक संदीप राजपूत यांच्या पथकाने वेतन अधीक्षकाच्या कार्यालय परिसरात सापळा लावला. शिक्षकाकडून ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना जऊळकर यास रंगेहाथ पकडले. ही कारवाई अधीक्षक संदीप आटोळे, अप्पर अधीक्षक विशाल खांबे, उपअधीक्षक मारुती पंडित यांच्या मार्गदर्शनात निरीक्षक संदीप राजपूत, अंमलदार केवलसिंग गुसिंगे, रवींद्र काळे, चांगदेव बागूल यांच्या पथकाने केली. या प्रकरणी वेदांतनगर ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.
वैद्यकीय बिलांसाठी होतो त्रास
प्रा. शि. विभागाच्या अंतर्गत वैद्यकीय बिलांसाठी शिक्षकांना त्रास सहन करावा लागतो. पैसे मिळाल्याशिवाय बिल मंजूरच होत नाही. वैद्यकीय उपचारानंतर मुख्याध्यापकाचे कव्हरिंग लेटर लावून घाटी हॉस्पिटल किंवा जिल्हा शल्यचिकित्सकांकडे बिल सादर केले जाते. तेथे तपासणीनंतर शिक्षणाधिकाऱ्यांकडे जाते. त्यांच्याकडून वेतन अधीक्षकाकडे जाते. तेथे मंजूर करून ट्रेझरीत पाठवतात. ट्रेझरीतून वैद्यकीय बिलाचे पैसे संंबंधित शाळेच्या बँक खात्यात जमा होतात. मुख्याध्यापक संबंधित शिक्षकाच्या बँक खात्यात वैद्यकीय बिलाचे पैसे पाठवितात, अशी ही किचकट प्रक्रिया आहे.