दोन आठवड्यांत वेतन देऊ; गरज पडेल तेव्हा बोलवू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:04 AM2021-09-03T04:04:14+5:302021-09-03T04:04:14+5:30
औरंगाबाद : दोन आठवड्यांत तुमचे वेतन मिळेल. भविष्यात गरज पडेल तेव्हा तुमचा सहानुभूतीपूर्वक विचार केला जाईल. अनुभव प्रमाणपत्रही दिले ...
औरंगाबाद : दोन आठवड्यांत तुमचे वेतन मिळेल. भविष्यात गरज पडेल तेव्हा तुमचा सहानुभूतीपूर्वक विचार केला जाईल. अनुभव प्रमाणपत्रही दिले जाईल, असे आश्वासन महापालिका प्रशासक आस्तिकुमार पाण्डेय यांनी गुरुवारी कामावरून कमी करण्यात आलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिले.
आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना थकीत वेतन न देता बुधवारी कामावरून कमी केले. त्यामुळे त्यांनी गुरुवारी सकाळीच महापालिका मुख्यालयात ठिय्या आंदोलन सुरू केले. आम्हाला कामावरून कमी करताना एक महिन्याचा, तरी कालावधी द्यायला हवा होता. आता कामावरून कमी केलेच, तर आमचे थकीत वेतन तत्काळ अदा करा, अशी मागणी करीत सुमारे ३०० हून अधिक कर्मचाऱ्यांनी प्रशासक पाण्डेय यांची भेट घेतली. प्रशासकांनी दोन आठवड्यांत वेतन देण्याचे आश्वासन दिल्यानंतर कंत्राटी कर्मचाऱ्यांनी पालिका मुख्यालय सोडले.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पालिकेने कंत्राटी पद्धतीने एमबीबीएस, बीएएमएस, बीएचएमएस डॉक्टर, परिचारिका, लॅब टेक्निशियन, वॉर्ड बॉय, डाटा एन्ट्री ऑपरेटर अशा सुमारे ७५० जणांची भरती केली होती. यातील सुमारे सहाशे जणांना कामावरून कमी करण्याचा निर्णय बुधवारी रात्री घेतला. त्यामुळे संतप्त होऊन कर्मचाऱ्यांनी गुरुवारी सकाळी महापालिका मुख्यालय गाठले. कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या गर्दीमुळे मुख्यालय आवारात दोन तास गदारोळ सुरू होता. सिटी चौक पोलिसांनी पालिकेत बंदोबस्त लावला होता.
मनपाला आजवर दिले ६० कोटी
कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. त्यामुळे त्यांना भेटण्यासाठी आंदोलक दालनाकडे गेले; पण पालिकेत त्या आलेल्या नव्हत्या. कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर रोष व्यक्त केला. पालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी जिल्हा नियोजन समितीला निधी मिळावा, यासाठी सुमारे आठ कोटी रुपयांचा प्रस्ताव काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी मंजूर केला. दरम्यान, प्रस्तावापूर्वीच पालिकेला वेतनासाठी सव्वाकोटी रुपये मिळाले होते. त्यातून कुणाला वेतन दिले, याविषयी प्रशासनाकडून अधिक माहिती मिळू शकली नाही. कोरोना संसर्ग उपाययोजनांबाबत आजवर ६० कोटी रुपयांचा निधी मनपाला मिळाला आहे.