छत्रपती संभाजीनगरात जाळपोळीनंतर शांतता; १६ पोलिस जखमी, ४०० ते ५०० जणांवर गुन्हे
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2023 06:26 AM2023-03-31T06:26:06+5:302023-03-31T06:27:09+5:30
या घटनेचा भाविकांच्या उत्साहावर किंचितही परिणाम जाणवला नाही.
छत्रपती संभाजीनगर : किराडपुऱ्यातील राम मंदिरालगतच्या परिसरात बुधवारी मध्यरात्री झालेल्या जाळपोळीच्या घटनेनंतर शहरात गुरुवारी दिवसभर सर्वत्र शांतता होती. समाजकंटकांनी केलेल्या जाळपोळीत पोलिस दलाची १५ आणि खासगी ३ वाहने खाक झाली. जमावाने केलेल्या दगडफेकीत १६ पोलिस अधिकारी, कर्मचारी जखमी झाले. याप्रकरणी ४०० ते ५०० जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या घटनेचा भाविकांच्या उत्साहावर किंचितही परिणाम जाणवला नाही.
पोलिसांत दाखल तक्रारीनुसार काही तरुण बुधवारी रात्री कमान उभारत होते. तेव्हा एका दुचाकीला धक्का लागल्यामुळे दोन तरुणांमध्ये बाचाबाची झाली. तेथे तैनात पोलिसांनी वाद मिटवला. त्यानंतर काही वेळाने दोन्ही बाजूंकडून घोषणा व दगडफेक सुरू झाली. पोलिसांनी जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, जमावाने पोलिसांच्या गाड्यांना टार्गेट केले.
उजाडण्यापूर्वीच उचलली वाहने
पाेलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यानंतर रस्त्यावर जाळलेली वाहने उजाडण्यापूर्वीच पोलिसांनी महापालिकेच्या मदतीने हटवली. त्याशिवाय रस्त्यावरील दगडांचा खच उचलून पाण्याने रस्ता धुतला. त्यामुळे सकाळी मंदिरात दर्शनास येणाऱ्या भाविकांना जाळपोळीच्या खाणाखुणाही दिसल्या नाहीत.
रामनवमी शांततेत
राम मंदिरात गुरुवारी सकाळीच दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. या घटनेनंतर शहरात सर्वत्र तणावपूर्ण शांतता आहे.