अमन, भाईचारा, कर्जमुक्तीसाठी दुआ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 12:21 AM2018-02-27T00:21:46+5:302018-02-27T10:41:28+5:30
देशात ‘अमन’, ‘भाईचारा’ कायम असावा, सर्वांना गुण्यागोविंदाने ठेव, संपूर्ण मानवकल्याणासाठी निर्णय घे, बळीराजाला कर्जमुक्ती दे, अशा शब्दांत सोमवारी राज्यस्तरीय इज्तेमामध्ये विशेष ‘दुआ’करण्यात आली. हजरत मौलाना साद साहब यांच्या नेतृत्वाखाली उपस्थित अथांग जनसागराने ‘आमीन’ म्हणून संबोधन दिले. ठीक ११.३३ मिनिटाला ‘दुआ’ सुरू झाली. तब्बल ४० मिनिटे ही दुआ सुरू होती. यावेळी उपस्थित लाखो भाविकांनी आपल्या अश्रूंचा बांध मोकळा करून दिला.
- मुजीब देवणीकर
औरंगाबाद : देशात ‘अमन’, ‘भाईचारा’ कायम असावा, सर्वांना गुण्यागोविंदाने ठेव, संपूर्ण मानवकल्याणासाठी निर्णय घे, बळीराजाला कर्जमुक्ती दे, अशा शब्दांत सोमवारी राज्यस्तरीय इज्तेमामध्ये विशेष ‘दुआ’करण्यात आली. हजरत मौलाना साद साहब यांच्या नेतृत्वाखाली उपस्थित अथांग जनसागराने ‘आमीन’ म्हणून संबोधन दिले. ठीक ११.३३ मिनिटाला ‘दुआ’ सुरू झाली. तब्बल ४० मिनिटे ही दुआ सुरू होती. यावेळी उपस्थित लाखो भाविकांनी आपल्या अश्रूंचा बांध मोकळा करून दिला.
देशभरात यापूर्वी झालेल्या सर्व राज्यस्तरीय इज्तेमाचे रेकॉर्ड आज औरंगाबादेत ब्रेक झाले. संयोजकांनी गृहीत धरलेल्या आकड्यापेक्षा कितीतरी जास्त पटींनी साथी लिंबेजळगाव येथे दाखल झाले. मागील तीन दिवसांपासून साथी शहरात दाखल होणे सुरूच होते. सोमवारी सकाळी ११ वाजेपर्यंत लिंबेजळगावच्या मुख्य रस्त्यावर पायी, वाहनांद्वारे येणार्यांची संख्या हजारोंपेक्षा जास्त होती. प्रथम हजरत मौलाना साद साहब यांनी उपस्थित लाखो साथींना तब्बल दीड तास मार्गदर्शन केले. यानंतर लाखो भाविक ज्या क्षणाची आतुरतेने चातकाप्रमाणे वाट पाहत होते तो क्षणही ११.३० वाजता आला.
साद साहब यांनी दुआला सुरुवात केली. संपूर्ण मानव कल्याणासाठी निर्णय घे, या देशात आणि जगभरात ‘अमन’ कायम ठेव. सर्वांना गुण्यागोविंदाने राहू दे. लहरी पावसामुळे देशातील शेतकरी उद्ध्वस्त झाला असून, चांगला व सर्वदूर पाऊस दे. आमचे सर्व गुन्हे पदरात घे... इज्तेमासाठी ज्यांनी कठोर मेहनत घेतली त्यांना ‘बरकत’ द्यावी. त्यांच्या घरी लक्ष्मी नांदू दे. ज्यांनी इज्तेमासाठी जमिनी दिल्या, सढळ हाताने मदत केली, त्यांचाही उद्धार कर, अशा शब्दांत दुआला सुरुवात झाली. त्यानंतर भाविकांसह मौलाना साद यांच्याही अश्रूंचा बांध फुटला. इज्तेमास्थळी उपस्थित लाखो भाविकांचे डोळे चिंब झाले होते.
दुआ संपल्यावर साथींनी इज्तेमा स्थळापासून कसे निघावे यावरही मार्गदर्शन करण्यात आले. सर्वप्रथम दुचाकी वाहनधारक बाहेर पडतील. त्यानंतर चारचाकी वाहनधारक एका तासानंतर पार्किंग स्थळातून बाहेर काढण्यात येतील. बस आणि ट्रक त्यानंतर निघणार असून, साथींनी निघण्याची अजिबात गडबड करू नये, असे आवाहन करण्यात आले.
राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन
सोमवारी दुपारी सामूहिक ‘दुआ’ झाल्यानंतर इज्तेमाची सांगता करण्यात आली. त्यानंतर औरंगाबाद-नगर महामार्गावर लाखोंच्या संख्येने साथी घराकडे जाण्यासाठी निघाले होते. पायी जाणार्या साथींसाठी लिंबेजळगाव, वाळूज, कमळापूर, रांजणगाव, साजापूर, पंढरपूर आदी ठिकाणी हिंदू-मुस्लिम बांधवांनी खिचडी, पोहे, थंडपेय, चहा आदींची व्यवस्था केली होती. या आदरातिथ्यामुळे मुस्लिम बांधव भारावून गेले होते. याशिवाय महामार्गावरील हॉटेल, ढाबे, पेट्रोल पंप आदी ठिकाणी भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.
रात्री उशिरापर्यंत साथींची रांग
लिंबेजळगावहून दुपारी १ ते ३ या वेळेत साथी बाहेर पडले. पायी चालत जाण्यासाठी त्यांना रात्री ८ वाजले. अनेक जण रात्री १० वाजेपर्यंत पायीच जात होते. लाखोंच्या संख्येने शहरात दाखल झालेल्या साथींसाठी त्वरित बसेस आणि रेल्वे उपलब्ध नव्हत्या. त्यामुळे रेल्वेस्टेशनवर साथींची अलोट गर्दी झाली होती.
महिला-मुलींना शिक्षण द्या- मौ. सादसाहब
महिला व मुली शिक्षित झाल्यास नवीन पिढीवर चांगले संस्कार घडतील. इस्लाम धर्म अमन-शांतीचा ‘पैगाम’ देतो. अल्लाह आणि प्रेषित हजरत मोहंमद पैगंबर यांनी संपूर्ण जगाला दाखविलेल्या मार्गाप्रमाणे जीवन जगावे. जगाचे किंवा ‘दीन’चे काम असेल, तर चांगल्या कामासाठी सतत पुढाकार घेण्याची गरज असल्याचे मत दिल्लीच्या मरकजचे प्रमुख मौलाना सादसाहब यांनी व्यक्त केले. त्यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी राज्यस्तरीय इज्तेमात ‘दुआ’ करण्यात आली.
समारोपाच्या दिवशी मौलाना उपस्थित अथांग जनसागराला काय मार्गदर्शन करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यांनी ‘रवानगी आणि दुआ’ या सत्रात मार्गदर्शन केले. ते पुढे म्हणाले की, प्रत्येक घरात पवित्र ‘कुरआन’ची तालीम करण्याची गरज आहे. जीवन कसे जगावे, याविषयी कुरआनमध्ये उल्लेख आहे. प्रत्येक स्त्री-पुरुषाला ‘कुरआन’ची तालीम देण्याची आज गरज आहे.
घरातील पुरुष मंडळींना मशीद, इज्तेमा, जमाअत तसेच इतर ठिकाणी इस्लामची माहिती मिळत असते. मात्र, महिला आणि विशेषत: मुलींना ‘दीन’ची माहिती मिळत नसल्यामुळे महिलांसाठी स्वतंत्र ‘जमात’ काढण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. घरातील महिला शिक्षित झाल्यावर नवीन पिढीवर चांगले संस्कार घडतील. यासाठी प्रत्येकाने महिला शिक्षणावर अधिक भर देण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले.
अल्लाह सर्वांना हिदायत (प्रेरणा) देणारा असून, तोच या संपूर्ण जगाचा पालनहार आहे. सर्वांना चांगले शिक्षण देऊन त्यांना अंधारमय अज्ञानातून बाहेर काढण्याची गरज आहे. मुस्लिम बांधवांनी सदैव अल्लाहचा ‘जिक्र’ करीत राहावे, असा सल्लाही त्यांनी दिला. ‘कुरआन’ची तिलावत व शिक्षणामुळे जगातील चांगल्या आणि वाईट गोष्टींची माहिती होते. प्रेषितांनी ‘दीन’ आपल्यापर्यंत पोहोचविण्याचे काम केले. समाजाला चांगली दिशा दाखविण्यासाठी कुणीही अल्लाहचा दूत येणार नसल्याने प्रेषितांनी दाखविलेल्या ‘नेकी’च्या मार्गावरून जीवन जगण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहनही त्यांनी शेवटी केले.