अयोध्या निकालानंतर शहरात शांतता; जागोजागी पोलीस बंदोबस्त 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2019 12:43 PM2019-11-09T12:43:11+5:302019-11-09T12:59:38+5:30

निकालाच्या पार्श्वभूमीवर शहरातील मुख्य रस्ते आणि बाजारपेठात वर्दळ कमी होती.

Peace in city after Ayodhya case result; police settles strong security | अयोध्या निकालानंतर शहरात शांतता; जागोजागी पोलीस बंदोबस्त 

अयोध्या निकालानंतर शहरात शांतता; जागोजागी पोलीस बंदोबस्त 

googlenewsNext

औरंगाबाद : संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या अयोध्येतील मशीद-मंदिर जमिनीच्या मालकीच्या वादावरील निकाल सर्वोच्च न्यायालयाने आज सकाळी दिला. राजकीय व सामाजिकदृष्ट्या संवेदनशील असलेल्या या निकालाच्या वाचनानंतर शहरात शांतता होती. तसेच निकालाच्या पार्श्वभूमीवर शहरातील मुख्य रस्ते आणि बाजारपेठात कमी गर्दी दिसून आली. दरम्यान, सुरक्षतेच्या कारणास्तव शहरात पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

Ayodhya Verdict: ऐतिहासिक निकाल... अयोध्येतील वादग्रस्त जमिनीवर मंदिर होणार; मशिदीसाठीही मोक्याची जागा!

अयोध्या प्रकरणी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालील पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे ४0 दिवसांच्या सुनावणीनंतर १५ आॅक्टोबरला न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता.  शनिवारी सकाळी १०.३० वाजेच्यानंतर संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या या सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निकाल सुनावला आहे. अयोध्येतील वादग्रस्त जमीन प्रभू श्रीरामाच्या मंदिरासाठी देण्यात यावी आणि सुन्नी वक्फ बोर्डाला मशिदीसाठी पाच एकर मोक्याची पर्यायी जागा द्यावी, असं सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाने म्हटलं आहे.

या निकालाच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी विविध धर्मगुरू, राजकीय पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन शहरात शांतता राखण्यासाठी आवाहन केले आहे. निकालाचे कोणतेही पडसाद शहरात पडून शांतता धोक्यात येणार नाही, याबाबत पोलिसांनी खबरदारी घेतली आहे. ३ पोलीस उपायुक्त, ६ सहायक आयुक्त, पोलीस निरीक्षक, सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक, असे २०० अधिकारी, ३ हजार ५०० कर्मचारी सज्ज ठेवण्यात आले आहेत. याशिवाय राज्य राखीव दलाच्या पाच कंपन्या, गृहरक्षक दलाचे जवान शहर पोलिसांच्या मदतीला आहेत. पोलिसांनी गस्त वाढविली असल्याचे पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी सांगितले. 

संवेदनशील वसाहतींमध्ये पॉइंट
पोलीस उपायुक्त मीना मकवाना यांनी सांगितले की, शहरातील संवेदनशील आणि मिश्र समाज वसाहतीत पोलिसांनी फिक्स पॉइंट लावले आहेत. १९९२ च्या दंगलीतील आरोपी असलेले आणि आताही सक्रिय असलेल्या लोकांना नोटिसा बजावून गैरकृत्य केल्यास कडक कारवाईला सामोरे जावे लागेल, असे  बजावण्यात आले आहे. शहरातील गर्दीचे ठिकाण, रेल्वेस्टेशन, बसस्थानक आदी ठिकाणची बॉम्बशोधक आणि नाशक पथकाकडून सतत तपासणी केली जात आहे. शहरातील विविध हॉटेल आणि लॉजची  तपासणी केली जात आहे. 

अफवांवर विश्वास ठेवू नका -पोलीस आयुक्त 
धार्मिक आणि जातीय दरी निर्माण करणाऱ्यांवर पोलिसांचे लक्ष असून, सोशल मीडियावरील विविध ग्रुप, फेसबुकवरही पोलिसांची नजर आहे. शिवाय कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलीस आयुक्तांनी केले. सोशल मीडियावरून आक्षेपार्ह संदेश, व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवर भा.दं.वि. १८८ नुसार आणि सायबर अ‍ॅक्टनुसार गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Peace in city after Ayodhya case result; police settles strong security

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.